येत्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी पक्षाची भूमिका, सामान्यांकडून मिळणारा प्रतिसाद, मराठी माणसांचे प्रश्न, धारावी पुनर्विकास अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ‘उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय हा एका रात्रीमध्ये झालेला नाही. त्यासाठी अनेक कारणे होती. मराठी माणसांसाठी, त्याच्या विकासासाठी काही ठोस गोष्टी करायला हव्यात यासाठी मी सातत्याने आग्रही होतो. क्वचितप्रसंगी या मुद्द्यावरून वादही व्हायचा. त्या कालावधीमध्ये मी उद्धव यांच्यासोबत दीड महिना होतो. सर्वसामान्यांचे, राजकीय असे अनेक मुद्दे त्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र, त्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही’, असा आरोप केला.
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याप्रमाणे राष्ट्रपतिपदासाठी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता, ती परंपरा पुढे नेत द्रौपदी मुर्मू यांनाही पाठिंबा द्यावा असेही सुचवले होते. भेटीची वेळही ठरली होती. पण ती भेट घेतली नाही. त्यावेळी पक्षाने व्हिपही जारी केला नाही. पक्ष सोडताना ही सर्व कारणे उद्धव ठाकरे यांना सांगितली’, असे शेवाळे यांनी सांगितले. ‘नेतृत्व सोडल्यामुळे मला गद्दार म्हणून कुणीही हिणवले नाही. मी चुकीच्या भूमिकेला विरोध केला’, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘दक्षिण मध्य मुंबई हा शिवसेनेसाठी भावनिक मतदारसंघ आहे. शिवसेना भवन, शिवाजी पार्क, चैत्यभूमी आणि सावकरांचे स्मारक अशा विविध बाबींमुळे हा मतदारसंघ शिवसेनेसाठी भावनिक मतदारसंघ आहे’, असे शेवाळे यांनी म्हटले. ‘नव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन होईल त्यावेळी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची घोषणा होईल अशी मला आशा आहे’, असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला.
‘मराठी माणूस हद्दपार होणार नाही’
मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत आहे,अशी ओरड वरचेवर होते. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आणि दक्षिण मध्य मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारती तसेच पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. मराठी माणूस मुंबईतून कधीही बाहेर फेकला जाणार नाही. पुनर्विकासाचा मुद्दा वा मोडकळीस आलेल्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. मराठी माणसांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. दादरकरांचे पुढील निवडणूकांपर्यंत स्वतःच्या हक्काच्या घरात जाता येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘वडाळ्यात पुनर्वसन’
‘राज्य सरकारच्या नव्या नियमांमुळे आता धारावीतील अनेक रहिवासी पुनर्विकास प्रक्रियेमध्ये पात्र होणार आहे. धारावीतील प्रत्येकाला घर देण्याची योजना आहे. त्यासाठी मास्टर प्लॅनही तयार करण्यात आला आहे. सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. वडाळा येथील मिठागरांच्या जागेवर धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येईल. मुंबईचा विकासआराखडा २०३४ तयार करताना पर्यावरणाच्या प्रश्नांचा विचार करण्यात आला आहे. आता जे ‘सन्माननीय’ सदस्य आक्षेप घेत आहे त्यांनी २०१२ पासून आक्षेप का घेतला नाही’, असा प्रश्न शेवाळे यांनी उपस्थित केला.