प्रिय रेणुका ताई, आपण प्रत्यक्षात कधी भेटलो नाहीये. परंतु तुमच्या हसतमुख अभिनयाची मी प्रचंड चाहती आहे. सुरभी मालिकेपासून ते रिटा सारख्या अनेक चरित्र चित्रपटातल्या आपल्या भूमिका या मानवी मनाचे विविध कंगोरे दाखवणाऱ्या आहेत. आपला सशक्त अभिनय बघताना आपल्या संवेदनशील मनाची आणि आपल्या प्रगल्भतेची सुद्धा जाणीव माझ्यासारख्या प्रेक्षकाला सातत्याने होत राहते. “मराठी पिपल आर नॉट वेलकम” या मुद्द्यावर आपण घेतलेली भूमिका प्रशंसनीय आहे.
ज्या महाराष्ट्राच्या फिल्म इंडस्ट्रीने मराठीच नाही तर विविध प्रांतातून आलेल्या अनेक कलाकारांना कलेची दालनं नुसती खुली करून दिली नाही, तर त्या सगळ्या जात, धर्म आणि प्रांतांच्या कलाकारांना या मायानगरीने सामावून घेतलं. आदरातिथ्य केलं… अनेकांच्या कित्येक पिढ्या खुशहाल झाल्या. त्या मायमराठी बद्दल या चंदेरी नगरातील आपल्यासारखी एक संवेदनशील अभिनेत्री अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन आपलं म्हणणं ठामपणे मांडते. यासाठी आपलं मनःपूर्वक अभिनंदन..!!
ताई आपण जितक्या ठामपणे भूमिका मांडली, त्यानंतर त्यावर राजकीय किंतु परंतु करत निव्वळ आणि निव्वळ आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणून आक्रस्ताळेपणा करणाऱ्या काही प्रतिक्रिया येतीलच. पण त्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी प्रगल्भता आपल्याकडे आहे. हे वेगळे सांगायला नको.
पण ज्यांनी आक्रस्ताळेपणा केला किंवा आपल्या हेतूविषयी शंका व्यक्त केली तीच माणसं कोविडच्या काळामध्ये जेव्हा माणूस माणसाला ओळखत नव्हता, रक्ताची नाती या महाभयंकर आजारापुढे कमकुवत ठरत होती. अशा काळात महाराष्ट्राच्या फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं की सगळ्यात चांगलं काम हे महाराष्ट्र मुंबई विशेषत: लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणाऱ्या धारावी पॅटर्नमध्ये झालं.
धारावी पॅटर्नमध्ये राहणारे लोक फक्त मराठी नाही. ते भारतभरातून धारावीमध्ये स्थायिक झालेले विविध जाती धर्माचे भाषेचे आणि प्रांताचे लोक आहेत, ज्यांची काळजी कुटुंबप्रमुख म्हणून तात्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. पण हे अशा आक्रस्ताळ्या लोकांना कळणार नाही. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अत्यंत गौरवपूर्ण आहे.
पण निव्वळ इतरांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी लेडी सोमय्या बनत जे गलिच्छ आरोप करणारे लोक आहेत ते आजही या प्रश्नाचे उत्तर देत नाही की, कोविडच्या काळामध्ये एकीकडे भाजपशासित राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये प्रेतं नदीवर तरंगत होती, गुजरातमध्ये प्रेतं रस्त्यावर जाळली जात होती. अशा काळामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य ठरलं, ज्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांच्या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार त्या-त्या जाती-धर्माच्या इतनामात झाले.
या महाभयंकर महामारीच्या काळात राजकारण बाजूला ठेवत माणुसकी म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित होतं. पण भारतीय जनता पार्टीचे नेते हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याऐवजी पीएम केअर फंडमध्ये पैसे टाका असे अत्यंत निर्लज्जपणे सांगत होते. या पीएम केअर फंडबद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आता माहिती मागितली असता हा फंड खाजगी होता असे उघड झाले. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी निधी न देता तो बाहेर पोहोचवणारे हे लोक खरंच यांना इतरांना प्रश्न विचारण्याचे अधिकार मिळतात का?
ज्या मुद्द्यांना घेऊन आक्रस्ताळेपणा केला जातोय ते मुद्दे आयुक्त चहल आणि आता त्यांच्याकडेच गेलेल्या खोपकर आणि कितीतरी नावं सांगता येतील. यांच्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. या काळात स्थायी समिती ज्यांच्याकडे होती ते यशवंत जाधव यामिनी जाधव कुटुंब, ज्यांच्यावर ढिगाने आरोप व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्यांनी केले. त्यांना आता निवडणूक प्रचारात उतरवणारे लोक यांना खरंच मराठीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो का?
असो, आपल्यासारख्या अभिनय क्षेत्रातल्या गुणी अभिनेत्रीला मात्र या सगळ्या राजकारणात कुणीही ओढू नये असे फार मनापासून वाटते. या निर्बुद्ध लोकांना याचीही कल्पना नाही की मध्य प्रदेशमध्ये जन्मलेल्या आणि पुढे हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ अशा विविध चित्रपटांमधून सशक्त अभिनयाची कारकीर्द गाजवणाऱ्या आशुतोष राणांच्या आपण अर्धांगिनी आहात. म्हणूनच नाईलाजाने कधी कधी आक्रस्ताळेपणा करणाऱ्या लोकांना उत्तर देणे अपरिहार्य ठरते. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो.