मद्यधुंद कार चालकाकडून महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न; पुण्यात खळबळजनक प्रकार

पुणे: पोर्शे अपघात प्रकरण ताजं असताना पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली. मद्यधुंद कार चालकानं महिला पोलीस अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी रात्रीची नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. याच तपासणी दरम्यान काल रात्री ८ वाजता फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनसमोर धक्कादायक प्रकार घडला.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांना चाप बसवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांना वाहन चालकांच्या तपासणीचे आदेश दिले आहे. त्यानुसार पुण्यात अनेक ठिकाणी नाकाबंदी करुन वाहन चालकांची तपासणी केली जाते. काल रात्री फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनसमोर महिला पोलीस अधिकाऱ्यानं एक कार रोखली. त्या कारमधील चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे महिला अधिकाऱ्यानं पुढील कारवाई सुरु केली.
Ravindra Waikar: गैरसमज झाला! भूखंड घोटाळ्यात वायकरांना दिलासा; सोमय्यांच्या यादीतील आणखी एक नेता ‘स्वच्छ’
यानंतर महिला अधिकारी आणि कार चालकात वाद झाला. चालकानं अधिकाऱ्याला पेट्रोल ओतून जाळण्याची धमकी दिली. जवळच पेट्रोल पंप होता. चालक संजय फकिरा साळवेनं पोलिसावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातात लायटर होतं. पण त्यानं ते उलटं धरलं होतं. मद्यधुंद अवस्थेत असल्यानं ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही. लायटर चुकीच्या पद्धतीनं धरलं असल्यानं मोठा अनर्थ टळला. यानंतर अन्य पोलिसांनी आरोपीला धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीनं पळण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो अपयशी ठरला.
MLC Election 2024: विधान परिषद निवडणुकीत कोणाचा गेम? क्रॉस व्होटिंगचा धोका, ‘त्या’ तिघांची नाराजी महागात पडणार?
संजय फकिरा साळवेला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा पिंपरी चिंचवडचा रहिवासी आहे. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. महिला पोलिसाचा जीव थोडक्यात बचावला. अन्य पोलीस तिच्या मदतीला धावल्यानं अनर्थ थोडक्यात टळला. पण यामुळे ड्रंक अँड ड्राईव्हचा मुद्दा आणि मद्यधुंद चालकांच्या मुजोरीचा विषय ऐरणीवर आला आहे.