मतांची जुळवाजुळव, विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाची उडी, बिनविरोध निकालाची शक्यता धूसर

पुणे : विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधान परिषदेची एक जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेवरील ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत असून ठाकरे गटाच्या हालचालींमुळे आता विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असतानाच आलेल्या या बातमीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

विधान परिषद ११ जागांसाठी निवडणूक

लोकसभा निवडणुकांच्या पाठोपाठ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेचे ११ सदस्य २७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर १२ जुलै रोजी ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी भाजपची चाचपणी; पंकजा-दानवेंची नावं शर्यतीत, हर्षवर्धन-चित्रा वाघही स्पर्धेत

ठाकरे गटाची उडी

संख्याबळानुसार महायुती विधान परिषदेच्या ९, तर महाविकास आघाडी २ जागा लढवणार असल्याचे संकेत यापूर्वी मिळत होते. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत मिळत होते. परंतु आता ठाकरे गटानेही निवडणुकीत उडी घेत ट्विस्ट निर्माण केला आहे. Ramdas Kadam : रामदास भाई तोंड सांभाळून बोला, दापोली तुमची एकट्याची जहागिरी नाही, भाजप जिल्हाध्यक्षाचा इशारा

आगे आगे देखो, होता है क्या

उद्धव ठाकरे लवकरच विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार आहेत. मतांची जुळवाजूळव पूर्ण झाली असून निवडणुकीत काय होतं पाहा, असं सूचक वक्तव्य ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याने केल्याची माहिती आहे. त्यामुळे परिषदेवरील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीनंतर आता ११ जागांची निवडणूकही रंगतदार होणार आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

बंडखोर आमदार संपर्कात

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून याआधीही करण्यात येत होता. आता १२ जुलैला होणाऱ्या गुप्त मतदान आणि लागोपाठच्या मतमोजणीत काय चमत्कार होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दुसरीकडे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून कोण रिंगणात उतरणार, हेही आता महत्त्वाचं आहे.