मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून…; जयंत पाटलांकडून नरेंद्र मोदींना सणसणीत उत्तर

इंदापूर (दीपक पडकर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेच्या भाषणात शरद पवार यांना भटकत्या आत्म्याची उपमा दिली. ही भटकती आत्मा ४५ वर्षापासून महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी कार्यरत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदींना मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून, ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांकडे आज उभा महाराष्ट्र बघतो आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यातील सणसर येथे सभेचे आयोजन केले होते या आयोजित सभेत पाटील बोलत होते..

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात आल्यानंतर केवळ पवार साहेबांवरच बोलणे त्यांच्यावर टीका करणे, याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना काही बोलताच येत नाही. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयीपर्यंत अनेकांची भाषणे ऐकली. मात्र विरोधकांवर नाहक टीका करण्याचे काम आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलेलं नव्हतं. कधीच एवढ्या टोकाची टीका. आपलं काम न सांगता हे करणं नरेंद्र मोदींना शोभतं असं मला वाटत नाही, असही पाटील यावेळी म्हणाले.

साम-दाम-दंड भेद वापरून सत्तेवर यायचं ठरवलं

प्रत्येक निवडणुकीआधी आणि नंतर वेगवेगळे अनुभव आपण घेतले आहेत. मात्र यंदाची निवडणूक ही वेगळी आहे. या देशांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांनी साम-दाम-दंड भेद वापरून सत्तेवर यायचे ठरवले आहे. त्यांचा भारतभर फिरणारा अश्वमेधाचा वारू हा महाराष्ट्रात शरद पवारांनी अडवला आहे. म्हणूनच रात्रंदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांवर टीका करतात, असंही पाटील म्हणाले.

पुण्याच्या सभेत अजित दादांकडून मोदींना खास गिफ्ट, मोदीही हसले

गुजरातसाठी काय केलं

पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा प्रश्न अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन विचारण्याची गरज नाही. या उलट माझा अमित शहाणला प्रश्न आहे की त्यांनी गुजरातसाठी काय केले? एवढेच त्यांनी सांगावे. हे जर त्यांनी सांगितलं तर देशाच्या ज्ञानात भर पडेल, असे म्हणत जयंत पाटलांनी अमित शहांवर टीका केली.