मतदानाच्या दिवशी सरींचा अंदाज, चौथ्या टप्प्यातील पुणे-अहमदनगर येथे ‘यलो अ‍ॅलर्ट’

प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसत असून सोमवारी चौथ्या टप्प्यातील, मतदानादिवशीही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभीजनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहिल्यादेवी नगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. यामधील पुणे, अहिल्यादेवी नगर येथे सोमवारी ‘यलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नंदुरबार, जळगाव, बीड येथेही हलक्या सरींची उपस्थिती असेल. रविवारीही पावसाचा अंदाज असल्याने प्रचाराच्या अखेरच्या रविवारी उमेदवारांना पावसाला तोंड द्यावे लागेल, अशी शक्यता आहे. ठाण्यात रविवारसाठी ‘यलो अॅलर्ट’ आहे, तर मुंबईमध्येही पावसाच्या हलक्या सरींचे पूर्वानुमान आहे.राज्यात रविवारी उत्तर कोकणापासून विदर्भापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारीही राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे वाहत होते. पावसाळ्याप्रमाणे वावटळीचा अनुभवही काही ठिकाणी नागरिकांनी घेतला. मुंबईमध्ये पाऊस नसला, तरी दिवसभर आर्द्रता वाढल्याने उकाड्याचे प्रमाण अधिक होते. मुंबईत कुलाबा येथे कमाल तापमान ३३.८, तर आर्द्रता ७२ टक्के नोंदवली गेली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३३.९ आणि आर्द्रता ५९ टक्के नोंदवली गेली. तापमान ३५ अंशांहून कमी असतानाही वातावरणातील आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास अधिक सहन करावा लागला.
Loksabha Elections: प्रचारतोफा थंडावल्या; पुणे, शिरुर, मावळसह राज्यातील ‘या’ ११ मतदारसंघांत उद्या मतदान

मुंबईत आज, रविवारी आणि उद्या, सोमवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर ठाण्यात रविवारी मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि पाऊस पडू शकतो. ठाणे जिल्ह्यात बुधवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातही रविवार ते बुधवार या चारही दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रायगडमध्ये रविवारी, रत्नागिरीमध्ये रविवारी आणि सोमवारी आणि सिंधुदुर्गात मंगळवारपर्यंत ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहू शकतात. वाऱ्यांचा वेग ३० ते ४० किलोमीटर असू शकतो.

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे रविवारी ‘यलो अॅलर्ट’ असून त्यानंतर बुधवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. अहिल्यादेवी नगर येथे रविवार आणि सोमवार दोन्ही दिवस ‘यलो अॅलर्ट’ असून बुधवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात रविवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ दिला असून वाऱ्यांचा वेग ५० ते ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. तुरळक ठिकाणी गाराही पडू शकतात. सोमवार आणि मंगळवारसाठी पुणे जिल्ह्यामध्ये ‘यलो अॅलर्ट’ आहे. सातारा जिल्ह्यातही रविवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’, तर सोमवार आणि मंगळवारी ‘यलो अॅलर्ट’ आहे. रविवारी तुरळक ठिकाणी गाराही पडू शकतात. कोल्हापूरात तसेच सांगली जिल्ह्यात सोमवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये मंगळवार, तर सांगलीत बुधवारपर्यंत ‘यलो अॅलर्ट’ आहे. सोलापूर जिल्ह्यात बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
Nashik: अकरा हजारांत मिळवा मानद डॉक्टरेट! ‘मटा’च्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक बाबी समोर

मराठवाड्यात नांदेड आणि लातूर येथे रविवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ आहे. या काळात वाऱ्यांचा वेग वाढू शकतो. रविवारी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली येथे ‘यलो अॅलर्ट’ असून बुधवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे. लातूर, धाराशीव, नांदेड येथे बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही अकोला, बुलडाणा येथे रविवारी, अमरावती, नागपूर, वाशिम येथे रविवारी आणि सोमवारी तर वर्धा आणि यवतमाळ येथे सोमवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भात सर्वदूर बुधवारपर्यंत ‘यलो अॅलर्ट’ची परिस्थिती कायम राहू शकेल, असे पूर्वानुमान प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवले आहे.

नागरिकांना आवाहन

मराठवाडा ते कर्नाटकाच्या अंतर्भागापर्यंत निर्माण झालेली ढगांची द्रोणीय स्थिती, वारा खंडितता प्रणाली यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सोमवारपर्यंत मेघगर्जना, जोरदार वारे आणि पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या परिस्थितीमध्ये तुरळक ठिकाणी विजा कोसळू शकतात. पिकांचे नुकसान, गारा पडणे अशा घटना घडू शकतात. शेतकऱ्यांनी कोवळ्या फळझाडांना, भाज्यांना मजबूत आधार द्यावा, अशी सूचना हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.