मंत्री व्हायला निघालास? पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो! अजितदादांचं आता कोणाला आव्हान?

पुणे: तू यंदा आमदार कसा होतो तेच मी बघतो. सगळ्या महाराष्ट्राला माहित्येय अजित पवारानं एकदा ठरवलं की एखाद्याला आमदार करायचं नाही, तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. २०१९ मध्ये अजित पवारांनी शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी जाहीर सभेतून दिलेलं आव्हान राजकीय वर्तुळात गाजलं. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शिवतारेंचा पराभव घडवून आणला आणि स्वत:चा शब्द खरा केला. आता अजित पवारांनी शरद पवार गटातील आमदार अशोक पवारांना थेट आव्हान दिलं आहे.

शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना लक्ष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अशोक पवार शरद पवार गटात राहिले. त्यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलं आहे.
दादांना ठाकरेंवर विश्वास, फडणवीसांचा वेगळाच कयास; २ उपमुख्यमंत्र्यांचे परस्परविरोधी अंदाज
अशोक पवारांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय का घेतला यावर भाष्य केलं. ‘दिलीप वळसे पाटलांचा शपथविधी झाला आणि याची सटकली. दादांनी याला मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं असं हा म्हणाला. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बसलेल्या आमदारांना त्यानं तसं सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या हा प्रकार सांगितला की तो असं असं म्हणत होता आणि मग तो तिकडे गेला,’ असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.
प्रश्न टाळले, काहीच न बोलता निघून गेले; अजितदादांच्या ‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटलांचं मौन
‘साहेबांनी त्याला गाजर दाखवलं. पुढच्या वेळेस तूच मंत्री होणार आहेस, असं त्याला सांगण्यात आलं. पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्यानं आता साखर कारखान्याची वाट लावली. बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघाला आहेस. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच मी बघतो,’ अशा शब्दांत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट आव्हान दिलं.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या आव्हानाला आमदार पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी छोटा कार्यकर्ता असून अजित पवारांबद्दल काही बोलू शकत नाही. अजित पवारांना अशी दमबाजीची भाषा शोभत नाही. माझ्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचं थकित कर्ज भरल्यावरदेखील नवं कर्ज मिळालं नाही. त्यामुळे कारखाना बंद पडला. अन्य कारखान्यांना कर्ज मिळालं. आमच्याच कारखान्यांना कर्ज का मिळालं नाही?’, असा सवाल अशोक पवारांनी विचारला आहे. मी आमदार व्हायचं की नाही ते शरद पवार आणि जनता ठरवेल. इतर कोणी ते ठरवू शकत नाही, अशा शब्दांत अशोक पवारांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं.