भुजबळांची ‘समता’ खेळी, नेमकी कोणावर कुरघोडी? मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जुन्या पक्षात परतणार?

मुंबई: ओबीसी समाजासाठी आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. त्यांना नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवायची होती. पण महायुतीत त्यांना संधी मिळाली नाही. प्रफुल पटेलांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी ते उत्सुक होते. पण १० दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पक्षानं संधी दिली. त्यामुळे भुजबळांची नाराजी वाढली आहे.

भुजबळांनी स्थापन केलेल्या समता परिषदेची काल मुंबईत बैठक झाली. भविष्याचा विचार करुन भुजबळांनी योग्य निर्णय घ्यावा. समता परिषद त्यांच्या सोबत असेल असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पक्षात होत असलेली भुजबळांची कोंडी पाहता समता परिषदेकडून भुजबळांवर दबाव आणला जात असल्याचं बोललं जातं. त्यामुळे भुजबळ काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
विनोद तावडे ‘लक्ष्मण’रेषा ओलांडणार? भाजपचे बॉस होण्यात ‘साऊथ’चा अडथळा; ओबीसी नेता रेसमध्ये
वेगळा निर्णय घेण्यासाठी समता परिषदेकडून टाकला जाणारा दबाव भुजबळांचीच खेळी असल्याची चर्चा आहे. कारण समता परिषद ही भुजबळांचीच संघटना आहे. त्यामुळे या संघटनेकडून भुजबळांवर दबाव टाकला जाईल का, हा प्रश्न आहे. संघटनेचा दबाव असल्याचं सांगून भुजबळ अन्य कोणावर दबाव टाकत आहेत का, हा खरा प्रश्न आहे. कारण सध्या तरी पक्षात त्यांना सातत्यानं डावलण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर छगन भुजबळांनी ओबीसींसाठी ठाम पवित्रा घेतला. त्यांनी ओबीसी समाजासाठी मेळावे घेतले. त्यामुळे मराठा समाजात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीबद्दल गेलेला संदेश सत्ताधाऱ्यांना लोकसभेत महागात पडला. मराठा समाजात भुजबळांची असलेली प्रतिमा पाहूनच त्यांना आधी लोकसभेला आणि मग राज्यसभेवर संधी नाकारण्यात आल्याचं बोललं जातं.
दोघात नको तिसरा, आता दादांना विसरा! भाजपमध्ये वाढतंय ‘त्या’ नेत्यांचं बळ, NCPसाठी वाट अवघड
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महायुती सरकारमधून बाहेर पडू शकतात. ते त्यांच्या जुन्या पक्षात परतण्याची शक्यता आहे. कधीकाळी कट्टर शिवसैनिक असलेले भुजबळ यांनी सेनेत बंड करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर भुजबळही पक्षातून बाहेर पडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भुजबळांनी अजित पवारांची साथ दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण या दोन्ही नेत्यांमध्ये कायम स्पर्धा राहिली आहे. भुजबळ हे अजित पवारांना राजकारणात सीनियर आहेत.

भुजबळ जाणार कुणीकडे?
छगन भुजबळ पुन्हा शरद पवारांकडे परतण्याची शक्यता अतिशय कमी आहे. पक्षफुटीनंतर शरद पवारांनी येवल्यात घेतलेली सभा भुजबळांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे आता भुजबळांकडे ठाकरेसेना आणि काँग्रेस असे दोन पर्याय उरतात. या दोन्ही पक्षांमध्ये त्यांनी आधी काम केलेलं आहे.