भीमा नदीत नौका उलटून सहा जण बुडाले, तिघांचे देह पाण्यावर तरंगताना दिसले, उजनी काठ सुन्न

इंदापूर : उजनी धरणाच्या जलाशयात करमाळा तालुक्यातील कुगाव (जि. सोलापूर) ते इंदापूर तालुक्यातील कळाशी दरम्यान नौका उलटून बुडालेल्या सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह अखेर सापडले आहेत, तर इतर तिघांसाठी शोधकार्य सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गुरुवारी सकाळच्या सुमारास तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याची माहिती आहे. मात्र बेपत्ता व्यक्तींचा शोध लागत नसताना नातेवाईकांचा संयम संपल्यामुळे त्यांनी बुधवारी या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरले होते.

मंगळवारी सायंकाळी बुडालेली नौका १७ तासांनी ३५ फूट खोलीवर सापडली. मात्र, नौकेतील सहा प्रवाशांचा चोवीस तास उलटल्यानंतरही ठावठिकाणा लागत नव्हता. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या स्थानिक पाणबुड्यांचे प्रशिक्षित बचाव पथक बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत होते. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय ३, सर्व जण रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव (ता. करमाळा) येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी पोहत किनारा गाठल्याने ते बचावले आहेत.

बावीस तास होऊनही बेपत्ता प्रवाशांचा शोध लागत नसल्याने बुधवारी दुपारी तीन वाजता कळाशी येथे जलाशयाच्या काठी येऊन नातेवाइकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. ‘तुमचे अधिकारी व कर्मचारी खूप कमी आहेत, त्यांची संख्या वाढवा, वेळ लागल्यास आमची माणसे हाती येणार नाहीत’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी नातेवाईकांची समजूत घातली. मनुष्यबळ प्रशिक्षित आणि पुरेसे असल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, तेथील युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

राजकीय नेत्यांकडून भेटी, सांत्वन

घटनेची माहिती मिळताच इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आदींनी घटनास्थळी दाखल भेट दिली. निंबाळकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही घटनस्थळाला भेट देऊन माहिती घेतली. बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांच्या आक्रोशामुळे उजनी काठ सुन्न झाला होता. सुळे यांनी त्यांना धीर दिला.