भाषण सुरू असताना चिठ्ठी आली; अजित पवार म्हणाले, …आणि ठोकाठोकी करण्याचा कार्यक्रम यांनी घेतलाय

इंदापूर(दीपक पडकर): महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेला संबोधित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उभे होते. त्यांचे भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्यांने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या काही पदाधिकाऱ्यांचा नाम उल्लेख राहिल्याबाबतची चिठ्ठी दिली. यावर अजित पवार मिश्किल टिप्पणी करत म्हणाले की, नाव घ्यायचा कार्यक्रम अजित पवारांकडे दिलाय आणि ठोकाठोकी करण्याचा कार्यक्रम यांनी… घेतलाय.. असे म्हणतात सभास्थळी एकच हशा पिकला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यातील पळसदेव या ठिकाणी आयोजित सभेत पवार बोलत होते.

भाषण सुरू असतानाच अजित पवार म्हणाले की, काय राव.. मी काय नावं घ्यायला आलोय काय.. एवढे सगळे मित्र पक्ष असले ना.. नाव घेण्यातच वेळ जातो. बायकोला बरं असतं.. एक नवऱ्याचे नाव घेतलं की काम फत्ते होते. च्यायला.. इथं तर यादीच आहे. त्यात पुन्हा कुणीतरी चिठ्ठी आणून देतय. ही राहिलंय.. निवडणुकीत जे उमेदवार असतात किंवा त्यांच्या जवळचे जे असतात.. त्यांना गप गुणांन.. ऐकावं लागतं…मतदान होईपर्यंत तुम्ही म्हणाल ती.. पूर्व दिशा.. म्हणावं लागतं, असे म्हणत त्यांनी नामउल्लेख राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव घेतली. अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या नावानंतर ‘जी’ असा शब्द प्रयोग करत त्यांची नावे घेतली.

भावनिकतेची लढाई नाही

महायुतीचे सरकार, आमचे महायुतीचे सगळे कार्यकर्ते आम्ही लोकप्रतिनिधी विकासकामाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही. निवडणुकीला वेळ कमी राहिलेला आहे, आपल्या इथे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार होत आहे, त्यामुळे भावनिक होऊ नका, ही भावनिकतेची लढाई नाहीये. ही भवितव्याची लढाई आहे. ही आपल्या प्रपंचाची लढाई आहे.

आम्ही कामाची माणसं,आम्ही विकास करणारी माणसे,आम्ही विरोधाला विरोध करणारी माणसं नाही, असले धंदे आम्हाला जमत नाही, यामुळे आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.