लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ‘मटा कट्टा’मध्ये विनोद तावडे सहभागी झाले होते. ‘निवडणुकीचे आतापर्यंतचे जे टप्पे पार पडले, त्यांमध्ये देश बळकट करण्यासाठी मतदारांचा कल मोदींकडेच असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती थोडी वेगळी असली तरी स्थानिक मुद्द्यांपेक्षा मतदान करताना मतदार देशाचा विचार करतील. त्यामुळे राज्यातही मोदींनाच मतदारांचा कौल असेल’, असे त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांचे इंजिन बंद पडले अशी टीका केली जात होती. त्याच मनसेला आता सोबत घेतले जात आहे. याबाबत विचारले असता, ‘परिस्थितीनुसार बदल स्वीकारावा लागतो. जनतेला स्थिर सरकार द्यायचे असेल तर वेगळा विचार करावाच लागतो. आम्ही काही वेगळे केले तर बदललो, आणि शरद पवार तर सकाळ, संध्याकाळी बदलतात त्यांचे काय?’ असा प्रतिप्रश्न तावडे यांनी केला.
‘यावेळी ४००पार नक्की’
‘देशभरात राज्यानुसार अभ्यास केला तर राजस्थान आणि बिहारमध्ये एखाद् दुसरी जागा कमी होईल. मात्र उर्वरित सर्व राज्यांत जागांमध्ये वाढच दिसत आहे. आम्ही केलेल्या आकलनानुसार भाजपला ३३५ ते ३४० जागा मिळतील. महायुतीचा विचार केला तर ४०३ ते ४०८ पर्यंत आम्ही मजल मारू यात शंकाच नाही’, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
‘प्रचारासाठीचे मुद्दे काँग्रेसनेच दिले’
‘राज्यघटना बदलणार अशी बोंब विरोधक ठोकत आहेत. राज्यघटना बदलायची असती तर २०१४, २०१९ मध्येच बदलली असती. पण त्यांनी हा मुद्दा आणला आणि आम्हालाच प्रचाराला मुद्दे मिळाले. काँग्रेसने कसे आणि केव्हा राज्यघटनेत बदल केले, हे सांगण्याची संधी मिळाली. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी देखील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा विषय काढून आम्हाला आणखी एक मुद्दा दिला’, असे तावडे यांनी सांगितले.
‘सहनुभूतीपेक्षा क्षमता महत्त्वाची’
उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहनुभूतीची लाट आहे असे आपल्याला वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले, ‘सहनुभूती वगैरे काही वाटत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे मतदार सहानुभूतीपेक्षा क्षमता पाहून मतदान करीत असतो. देश चांगल्याप्रकारे चलविण्याची क्षमता केवळ नरेंद्र मोदींमध्येच आहे, हे मतदारांना ठाऊक आहे.’
‘रोजगारासाठी पलायन थांबायला हवे’
कोकणातील अनेक घरे सध्या बंद आहेत. रोजगारासाठी तरुणांचे शहराकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत विचारले असता, ‘रोजगारासाठी होणारे हे पलायन, स्थलांतर थांबायला हवे’, असे तावडे म्हणाले. ‘केवळ कोकणच नाही तर ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे, तिथे तरुणांना रोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत यावर आमचे काम सुरू आहे. केवळ चांगली शेती देऊन चालणार नाही, तर त्यासाठी बाजारपेठ, इतर सुविधा, जोडधंदे यांची व्यवस्था करायला हवी आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत’, असे ते म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘गैरसोयीबद्दल जाहीर माफी’
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमध्ये ज्यांची गैरसोय झाली, त्यांची मी मनापासून माफी मागतो. अशी गैरसोय होता कामा नये’, असे तावडे म्हणाले. मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रचाराच्या पद्धतीचा वेगळा विचार करायला हवा का? असे विचारले असता, त्यांनी हे उत्तर दिले. ‘अशाप्रकारचे कार्यक्रम कधी केले पाहिजेत. त्याचे नियोजन, वाहतुकीचे बदल याबाबतची जनजागृती आधीपासून करायला हवी’, असे तावडे यांनी नमूद केले.