केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र प्रदेश भाजपमध्ये भाकरी फिरवण्याचे ठरवले, तर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नावाचा विचार दिल्ली दरबारी सुरू आहे. अलीकडे लोकसभेच्या तिकीटासाठी मुंबईला अनेक वाऱ्या करणारे कराड यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले ट्युनिंग निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
निवडणुका जिंकणे हेच लक्ष्य मानणाऱ्या भाजपचे त्या अर्थाने सर्वांत यशस्वी अध्यक्ष अशी नोंद नड्डा यांच्या नावावर झालेली आहे. नड्डा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी जूननंतर एका वर्षासाठी वाढवण्यात आला होता. मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुका व यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही वाढवलेली मुदतदेखील लवकरच संपणार आहे. भाजपच्या यंदाच्या दिल्ली राष्ट्रीय अधिवेशनात मोदी-शहा यांनी भाजपची घटना दुरुस्त करून पक्षाध्यक्षांच्या निवडीचे सर्वाधिकार संसदीय मंडळास बहाल केले; मात्र विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या अध्यक्षांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याने, नड्डा यांना आणखी घटनादुरुस्ती करून मुदतवाढ द्यायची की नवीन अध्यक्ष नेमायचे, याचा निर्णय मोदी यांना तातडीने घ्यावा लागणार आहे. नव्या अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर संघटनेतील आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील.
तावडे, यादव, अग्रवाल चर्चेत
भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत विनोद तावडे यांच्यासह केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व अग्रवाल यांचीही नावे आघाडीवर आहेत; मात्र ज्या नावांची चर्चा होते, त्यांची नियुक्ती केली जात नाही, हाही मोदीयुगातील भाजपचा इतिहास आहे. यादव केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. तावडे यांच्या नावाला दोन्ही सर्वोच्च नेत्यांची पसंती असल्याचे सांगितले जाते; मात्र विधानसभा निवडणुकीच्या आगेमागे त्यांना महाराष्ट्रात परत पाठवण्याची योजना असेल, तर तूर्त त्यांना राष्ट्रीय पक्षसंघटनेतच रहाण्यास सांगितले जाऊ शकते.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
कामगिरीचे मूल्यांकन
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर भाजप नेतृत्वाने आपल्या कामगिरीचे मूल्यांकन सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे गृहमंत्री अमित शहा व वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी रात्री दीर्घ काळ बैठक चालल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातून मिळालेल्या प्रतिक्रियांआधारे ज्या राज्यांमध्ये भाजप आघाडीस नुकसानीची शक्यता आहे, त्यात महाराष्ट्र आणि बिहारची नावे ठळकपणे घेतली जात होती; मात्र एक्झिट पोलनुसार हा अंदाज चुकीचा निघाला असल्याचे पक्षनेते सांगत आहेत.