भाजप, काँग्रेसमध्ये टफ फाईट, पण ‘त्या’ भीतीनं हवा टाईट; वर्षा गायकवाड, निकमांची अडचण काय?

मुंबई: उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला बराच वेळ लागला. काँग्रेसनं उमेदवाराची घोषणा केल्यानंतर भाजपनंही उमेदवार जाहीर केला. पण यानंतर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची नाराजी समोर येत आहे. या मतदारसंघात महायुतीचे उज्ज्वल निकम विरुद्ध महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड अशी लढत आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धारावीच्या आमदार असलेल्या वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्यमधून तिकीट जाहीर होताच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उघडपणे विरोध दर्शवला. तर भाजपच्या उमेदवाराविरोधात पक्षांतर्गत नाराजी आहे. भाजपचे स्थानिक नेते त्यांच्या उमेदवाराचा उल्लेख खासगीत बोलताना पॅराश्युट उमेदवार असा करतात. निकम यांना थेट दिल्लीतून तिकीट मिळालंय. जिंकल्यानंतर ते दिल्लीला जाऊ शकतात, असं स्थानिक नेते म्हणतात.
धनदांडगे भेटले अन् आंबेडकरांनी तासाभरात निर्णय बदलला; शेंडगेंची आंबेडकरांवर जळजळीत टीका
तिकीट मिळण्यापूर्वी निकम भाजपमध्ये नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांशी त्यांचा अजिबात संवाद नव्हता. निकम प्रख्यात वकील आहेत. ते नंतर कार्यकर्त्यांना वेळ देतील का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन सलग दोनवेळा भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात नाराजी असल्यानं यंदा त्यांचं तिकीट कापण्यात आलं. पूनम कशा का असेनात, त्यांना भेटताना जास्त त्रास व्हायचा नाही. पण निकम यांना भेटणं सोपं नसेल, असं स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना वाटतं.

दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार यांचा मुख्य जनाधार धारावी आहे. त्यांना दक्षिण मध्य मतदारसंघातून निवडणूक लढायची होती. पण त्यांना उत्तर मध्यमधून तिकीट देण्यात आलं. या मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसमधून अनेक नेते उत्सुक होते. त्यामुळे गायकवाड यांना तिकीट मिळताच नसीम खान, भाई जगताप यांची नाराजी जाहीरपणे समोर आली. पक्षांतर्गत कलहाचा फटका वर्षा यांना बसू शकतो.