भाजपमध्ये बदलांचा धडाका, कीर्तिकरांचा वायकरांनाच तडाखा, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. भाजपमध्ये बदलांचा धडाका

लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, मात्र दोन वेळा स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणाऱ्या भाजपला यंदा जादुई संख्याबळही पार करता आलेलं नाही. महाराष्ट्र, यूपी, राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. यानंतर आता भाजपात मोठे फेरबदल करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आणि राज्यांतही खांदेपालट करण्यात येणार आहे.

२. महायुती गेमचेंजर योजना आणण्याच्या तयारीत

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दणका दिल्यानंतर महायुती सरकार विधानसभा निवडणुकीआधी लोकाभिमुख योजनांचा धडाका लावण्याच्या तयारीत आहे. मध्य प्रदेशात भाजपच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोरगरीब, निम्न मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा होतील, अशा योजनेची आखणी सुरु आहे.

३. वायकरांच्या विरोधात कीर्तिकरांचा सल्ला

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयावर ठाकरे गटाने शंका उपस्थित केली आहे. मात्र आता ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांचे पिता माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनीही अप्रत्यक्षपणे वायकरांच्या विजयाविरोधात कोर्टात जाण्याचा सल्ला मुलाला दिला आहे.

४. मुलीचं नाव मतदार यादीतून वगळलं

विधान परिषदेवरील मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदार यादीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नोंदवलेली १२ हजार नावं कोणत्याही कारणाविना वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी केला. निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली ही नावं गाळल्याचा आरोप परबांनी यावेळी केला. माझ्या मुलीचं नावही या यादीतून वगळलंय, असा आरोपही परब यांनी निवडणूक आयोगावर केला.

५. मोहोळ यांचं संरक्षण मंत्र्यांना पत्र

लोहगाव विमानतळाची धावपट्टी वाढवण्यासाठी हवाई दल आणि नागरी विमान वाहतूक खाते अशा दोघांच्याही संयुक्त सर्वेक्षणाची आवश्यकता आहे. नागरी विमानतळासाठी आवश्यक असलेल्या नियमांच्या पूर्तेतेसाठी सर्वेक्षण महत्त्वाचं आहे. त्यासाठी हवाई दलाला तातडीने सूचना द्याव्यात,’ अशी विनंती केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्राद्वारे केली आहे.

६. पुण्यात टँकरमध्ये महिलेचा मृतदेह

फुरसुंगी पॉवर हाऊसच्या शेजारी असलेल्या कामठे वस्तीत पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. टँकरच्या वॉलमधून पाणी बाहेर येत नसल्याने चालक टँकरवर चढला असता, त्याला आत महिलेचा मृतदेह तरंगत असताना आढळला. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे.

७. नाटकातून रामायणाची विटंबना; १ लाख २० हजारांचा दंड

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी ‘राहोवन’ नाटकाच्या सादरीकरणात प्रभू श्रीराम आणि रामायण यांचा अवमान केल्याचा आरोप असून आठ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी तब्बल ४० हजार ते एक लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या या प्रकरणामुळे संस्थेच्या आवारात वाद निर्माण झाला होता.

८. ओला इलेक्ट्रिक आयपीओ लवकरच

गेल्या काही दिवसांपासून सेबीच्या सिग्नलवर उभ्या असलेल्या ओलाच्या गाडीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक ओला इलेक्ट्रिकला सेबीकडून निधी उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजे IPO लाँच करण्यास मंजुरी मिळाली आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपमधील हा पहिलाच आयपीओ असेल. २०२४ मधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा नवा आयपीओ ठरण्याचे संकेत आहेत. या आयपीओतून नवीन शेअर्सद्वारे ५,५०० कोटी रुपये आणि ९.५२ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) विक्रीस उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

९. आठवा वेतन आयोग कधी होणार लागू?

एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे. पगार, भत्ते आणि निवृत्ती वेतनाचा आढावा घेण्यासाठी सरकारने लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करावा, अशी कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे. राष्ट्रीय परिषदेने कॅबिनेट सचिवांना पत्र लिहित आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. राष्ट्रीय परिषद सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला प्राधान्य देण्याचं आवाहन सरकारला केलं आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

१०. रोहित शर्माचा विक्रम मोडीत, विराटने इतिहास रचला

विराट कोहली टी-२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच दोन अंकी धावसंख्या उभारु शकला आहे. विराट यावेळी चांगल्या लयीत दिसला. विराटने या सामन्यात २४ धावा केल्या असल्या तरी त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडून इतिहास रचला. भारताकडून टी-२० क्रिकेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावे जमा झाला आहे.