भाजपनं मला हिंदुत्त्व शिकवावं? मुस्लीम लीग, मुखर्जी, फझलूल हक; उद्धव ठाकरेंनी सगळंच काढलं

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. उद्धवसेनेचा उल्लेख त्यांच्याकडून नकली सेना असा केला जात आहे. मोदींनी नुकत्याच झालेल्या एका सभेत ठाकरेंचा उल्लेख नकली संतान असा केला. त्या टिकेला उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून प्रत्युत्तर दिलं आहे.

बाळासाहेबांची शिवसेना म्हणण्याआधी त्यांनी बाळासाहेबांना ‘हिंदुहृदयसम्राट’ बोललं पाहिजे. कारण त्यांचं ते दुखणं आहे की त्यांना अद्याप कोणीही हिंदूंचा कैवारी म्हणतच नाही. कारण त्यांच्या सत्ताकाळाला १० वर्षे झाली तरीही मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदूंना आक्रोश मोर्चे काढावे लागले. म्हणजे त्यांच्या राज्यात हिंदू सुरक्षित नाहीत आणि ते हिंदुहृदयसम्राट होत नाहीत, अशी टीका ठाकरेंनी केली.
आधी मुख्यमंत्री, मग उपमुख्यमंत्री; फडणवीसांसाठी पुढचा प्लान काय? मोदींनी सांगितली ‘जबाबदारी’
वैचारिक म्हणाल तर श्यामाप्रसाद मुखर्जींपर्यंत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपचा राजकीय बाप काढला. ‘भाजपचा राजकीय बाप म्हणजे जनसंघ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे. म्हणजे त्यांची वृत्ती कशी आहे ती बघा. संयुक्त महाराष्ट्र समिती होती. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हे कधी उरतले नाहीत. पण निवडणुकीत लढायला म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीत घुसले. जर काही मिळवता आलं तर मिळवावं म्हणून जागावाटपाचं भांडण झालं. जागावाटप झालं तरी यांनी सात एक जागा लढवल्या होत्या. तेव्हा माझ्या आजोबांनी इशारा दिला होता. मग त्यातून हे बाहेर पडले. म्हणजे हे लढ्यात कुठेच उतरले नाहीत,’ असं म्हणत ठाकरेंनी हल्लाबोल केला.
विजयाची इतकी खात्री, मग राज ठाकरे कशाला हवेत सोबती? मोदींनी भूतकाळ काढला, हेतू सांगितला
श्यामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख करत त्यांनी भाजपकडून होणाऱ्या औरंगजेब फॅन क्लबला टिकेला उत्तर दिलं. ‘साधारणत: ४०-४२ सालचा काळ होता. श्यामाप्रसाद मुखर्जींनी तत्कालीन मुस्लीम लीगनं देशाची फाळणी मागितली होती. गांधीजींनी आणि काँग्रेसनं इंग्रजांना ‘चले जाव’चा आदेश दिला होता आणि श्यामाप्रसाद मुखर्जींनी तिथल्या गव्हर्नरला सांगितलं होतं की चले जाव चळवळ चिरडली पाहिजे. तिच्याशी मुकाबला केला पाहिजे. तत्कालीन लीगच्या फझलूल हक यांच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी ११ महिने अर्थमंत्री होते. याचा अर्थ तुम्ही काय सांगाल? आणि भाजपनं मला हिंदुत्त्व शिकवावं? त्यांनी मला बाळासाहेबांचे विचार शिकवायचे? आणि त्यांच्याकडून मी शिकायचे? हा कोणता प्रकार?,’ असे प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले.

स्वातंत्र्य लढ्यात जनसंघ कुठेही नव्हता. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस उतरली होती. ती काँग्रेस नको म्हणून देशाची फाळणी मागणाऱ्या तत्कालीन मुस्लीम लीगच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. बंगालच्या फाळणीला तुम्ही तेव्हा पाठिंबा दिलात. चले जावला विरोध केलात, तुमच्याकडून मी काय शिकायचं, असा सवाल ठाकरेंनी भाजपला केला.