भाजपच्या ‘मित्रा’मुळे खासदारकी हुकली; दादा तरुण नेत्याला आमदार करणार? परिषदेसाठी नाव फायनल?

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत संघर्ष आहे. सध्याचं पक्षीय बलाबल पाहता महायुतीला ९ आणि महाविकास आघाडीला २ जागा मिळू शकतात. भाजपनं कालच ५ जणांच्या नावांची घोषणा केली आहे. शिंदेसेनेनं २ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

भाजपनं विधान परिषदेसाठी ओबीसींना झुकतं माप दिलं आहे. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभेपाठोपाठ विधानसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. पंकजा मुंडे वंजारी समाजातून येतात. फुके हे कुणबी समाजाचे, तर खोत हे मराठा समाजाचे आहेत. टिळेकर माळी समाजाचे आहे. अमित गोरखे पिंपरी-चिंचवडचे भाजप कार्यकर्ते आहेत. विशेष म्हणजे फुके, खोत, टिळेकर आणि गोरखे हे चारही नेते फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत.
जुन्या पेन्शनसंदर्भात तीन महिन्यांत निर्णय, कर्मचाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : अजित पवार
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप तरी उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेल्या आमदारांची संख्या पाहता त्यांचे २ उमेदवार विजयी होऊ शकतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात इच्छुकांच्या नावांवर चर्चा झाली. यानंतर सहा जणांची नावं निश्चित करण्यात आली. यात बाबा सिद्दिकी, आनंद परांजपे, संजय सावंत, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांच्या नावांचा समावेश होता. या बैठकीत गर्जे आणि विटेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं.

परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकरांचं नाव परभणी लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत होतं. ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जात असल्यानं विटेकरांना लोकसभेचं तिकीट मिळेल हे निश्चित मानलं जात होतं. पण राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देण्यात आली. इथून महादेव जानकर रिंगणात उतरले. पण ठाकरेसेनेच्या संजय जाधव यांनी जानकरांचा १ लाख ३४ हजार ६१ मतांनी धुव्वा उडवला. लोकसभा हुकलेल्या विटेकरांना अजित पवार विधान परिषदेवर संधी देण्याची दाट शक्यता आहे. शिवाजीराव गर्जे यांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. ते पक्षाचे सरचिटणीस आहेत. पक्षाच्या कायदेशीर बाबी सांभाळण्याचं काम ते करतात.