भरचौकात टेम्पोचालकाची दाम्पत्याला मारहाण; कारण ठरला ट्राफिक सिग्नल, पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे : बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत असून, आता बेशिस्त वाहनचालकांमुळे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. लाल सिग्नल लागल्याने चारचाकी थांबवलेल्या दाम्पत्याने पुढे जाण्यासाठी जागा दिली नाही, या कारणास्तव एका बेशिस्त टेम्पोचालक तरुणाने दाम्पत्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे घडला. मारहाण झालेल्यांमध्ये गर्भवती महिलेचाही समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना २४ जून रोजी दुपारी तीन वाजता घडली. मोशी येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षीय व्यक्तीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून ओंकार बाळासाहेब कंधारे (वय २८, रा. बदामी हौद, शुक्रवार पेठ) याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार त्यांच्या चारचाकीतून डेक्कनकडून कृषी महाविद्यालयाच्या दिशेने चालले होते. त्या वेळी संत ज्ञानेश्वर पादुका चौकात सिग्नल लागला. त्यामुळे तक्रारदाराने चारचाकी सिग्नलला थांबवली. तेव्हा आरोपी तक्रारदाराच्या मागून टेम्पोतून सिग्नलला आला. त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी हॉर्न वाजवला. तेव्हा तक्रारदाराने आरोपीला विचारणा केली. त्यावर आरोपीने ‘तुझी गाडी पुढे घे,’ असे म्हणून टेम्पोतून खाली उतरून शिवीगाळ केली. आरोपी तक्रारदाराच्या पत्नीला शिव्या दिल्या, तर तक्रारदाराला मारहाण केली. यामध्ये तक्रारदाराच्या नाकाला दुखापत झाली. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार ४१(अ-१) नोटीस बजावली आहे.

Hijab Controversy: इराणमध्ये महिलांवर ‘नूरी’ची जरब; हिजाब न घातलेल्या महिलांचा शोध
वाहतूक पोलिस गायब

डेक्कन, शिवाजीनगर भागातील महत्त्वाच्या आणि कायम वर्दळ असणाऱ्या चौकांपैकी संत ज्ञानेश्वर पादुका चौक हा एक चौक आहे. मात्र, या चौकात वाहतूक नियमनासाठी बहुतांशी वेळा वाहतूक पोलिस कर्मचारी नसतात. त्यामुळे सिग्नल लागल्यानंतरही त्याचे पालन न करणे किंवा विरुद्ध दिशेने भरधाव गाडी चालविण्याचे प्रकार सर्रास घडतात. दाम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली, तेव्हा वाहतूक पोलिस कर्मचारी तेथे उपस्थित असते, तर हा प्रकार घडला नसता.