मुलगा किंवा बायको पक्ष सोडून जाणार नाही म्हणून….
मुलगा किंवा बायको पक्ष सोडून जाणार नाही याची खात्री अजितदादांना असावी. म्हणून त्यांनी घरातच उमेदवारी दिली. त्यांच्यासोबत असलेले नेते आमदार, इथून पुढच्या काळात त्यांच्यासोबत राहतील, अशी कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे पुढच्या सहा वर्षासाठी कुठलं तरी पद आपल्याबरोबर असावं या दृष्टिकोनातून दादांनी कदाचित सुनेत्रा काकींना उमेदवारी दिली असावी, असे टोले रोहित पवार यांनी लगावले.
सुनेत्रा पवार यांच्या राज्यमंत्रिपदावर रोहित पवार म्हणतात…
सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होणार असून त्यांच्या केंद्रीय राज्यमंत्रिपदाच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. याविषयी पत्रकारांनी रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, अजित पवार यांनी आधीच सांगितले होते की राज्यमंत्रिपद आम्हाला शोभणारे नाही. काकींना राज्यमंत्रिपद दिले तर अजित पवारांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागेल. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे अजित पवारांना माहिती आहे. म्हणून त्यांनी इतरांना उमेदवारी न देता काकींना दिली.
जयंत पाटील आणि तुमच्यामध्ये वाद? रोहित पवार म्हणाले…
दुसरीकडे अहमदनगरमधील राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामधील मतभेद समोर आल्यानंतर विविध चर्चांना सुरूवात झाली होती. याचविषयी रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, “जयंत पाटील आणि माझ्यात कुठे वाद आहेत? प्रसारमाध्यमांनी वेगळा अर्थ काढला. आमच्यात वाद नाहीच, आम्हाला आमच्या जागा वाढवायच्या आहेत”, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली.