बोपोडी अपघात प्रकरण; अपघाताचं कारण समोर, पोलीस तपासात धक्कादायक कारण उघड

प्रतिनिधी, पुणे : बोपोडी परिसरात रविवारी मध्यरात्री झालेला अपघातालाही ‘मद्यपार्टी’च जबाबदार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अपघातग्रस्त भरधाव कारमध्ये चालकासह चौघे जण होते. ते धानोरी येथे पार्टी करून घरी जात असताना अपघात झाला. दरम्यान, कल्याणीनगर येथील पोर्शे अपघातही पार्टीनंतरच झाला होता. त्यामुळे पार्ट्यांमध्ये मद्यपान केल्यानंतर बेदरकारपणे वाहन चालविणे धोकादायक ठरत असल्याचेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले.बोपोडी परिसरात रविवारी मध्यरात्री भरधाव कारने पोलिस मार्शलच्या दुचाकीला धडक दिली. त्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर, एक कर्मचारी गंभीर जखमी आहे. या अपघात प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात कारचालक सिद्धार्थ ऊर्फ गोट्या राजू केंगार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याला रविवारी अटक करण्यात आली आहे.
Pune Hit and Run: स्वारगेटला हिट अ‍ॅंण्ड रनचा प्रकार, CA तरुणाचा मृत्यू, सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक घटना

आरोपीला कोठडी

अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे चालकाचा शोध घेतला. तसेच, कारमध्ये अन्य किती जण होते, याचा शोध घेऊन अन्य तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरोपी सिद्धार्थ केंगार कार चालवित होता. केंगार सध्या पोलिस कोठडीत असून, अन्य तिघांना चौकशी झाल्यानंतर सोडण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. आरोपी केंगारला मंगळवारी शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस मार्शल समाधान कोळी बचावले असते

भरधाव कारच्या धडकेनंतर कारच्या बॉनेटवर पडल्यानंतरही पोलिस मार्शल समाधान कोळी बचावले असते. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता, जखमींना मदत न करता पळून जाण्याच्या वृत्तीने कोळी यांचा जीव घेतला. अपघातानंतर पळून जाण्यासाठी कारचालकाने गाडीचा वेग आणखी वाढवला. त्यात कोळी कारच्या चाकाखाली सापडले. त्यांना त्याच अवस्थेत कारचालकाने काही अंतर फरपटत नेले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कोळी यांचा जागीच मृत्यू झाला.

जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर रविवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास बोपोडीत हा अपघात झाला. अपघातात कोळी यांना प्राण गमवावे लागले असून, त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ‘अपघातानंतर कारचालकाने गाडी थांबवून जखमींना मदत करण्याची भूमिका घेतली असती, तर कदाचित कोळी यांची जीव वाचला असता,’ अशी भावना पोलिसांतील त्यांचे सहकारी व्यक्त करत आहेत.