संजय राऊत काय म्हणाले?
संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला. “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार आहेत, पण मुख्यमंत्रिपदाचा काय फॉर्म्युला असणार आहे? ज्याच्या जागा जास्त, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं काही ठरलं आहे का?” असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला.
ठाकरेंचं काम महाराष्ट्राने पाहिलंय
यावर राऊत त्वेषाने म्हणाले की, “असं कोणी सांगितलं? असं कोणी जाहीर केलं आहे का? महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं, हा धोका आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे. लोकसभेतील अनेक घटकांचं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद एकत्र होती.” असं सांगताना संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर करण्याचं सुचवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी अजिबात नको
“बिनचेहऱ्याचं सरकार किंवा बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी अजिबात चालणार नाही. लोकं स्वीकारणार नाहीत, लोकांना चेहरा द्यावाच लागेल.” असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करणार का? तसं झाल्यास तो ठाकरेंचाच असणार की अन्य कोणाचा, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.