निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा मराठीत उल्लेख तुतारी असा केला आहे. त्यामुळे बारामती आणि अहमदनगरनंतर शिरूरमध्येही मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिरुर मतदारसंघात ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या दोन गटांत लढत होत आहे. शरद पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ही लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अन्वर शेख यांना उमेदवारी दिली आहे.
शिरूर लोकसभेत तुतारी हे चिन्ह मनोहर वाडेकर यांना मिळालं आहे. वाद्यं वेगवेगळी असली तरी निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हांच्या उल्लेखात तुतारी या शब्दाचं साम्य ठेवलेलं आहे. त्यामुळे चिन्ह पाहून मतदान करणाऱ्यांमध्ये याचा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे, बारामती, शिरुर आणि अहमदनगर येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हं असतानाच तिथेच ट्रम्पेटची तुतारी वाजल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
शिरूर लोकसभेसाठी एकूण ३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने ३२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अंतिम झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी चिन्हाचे वाटप केले. ट्रम्पेट अर्थात तुतारी चिन्हाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काही फटका बसतो का? हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईल.