बारामतीला अवकाळी पावसाचा फटका, घरावरील पत्रे उडाल्याने अन्नधान्य भिजले, शेतकऱ्याचे मोठं नुकसान

बारामती: बारामती तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. पावसाने अन्नधान्य भिजून मोठे नुकसान झाले. बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावासह परिसरात आज सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाबरोबरच वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज दिवसभर उन्हाची तीव्रता असतानाच सायंकाळच्या सुमारास ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा वाहू लागला.
Pune Rain: पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय अन् अनेक ठिकाणी झाडे पडली, नागरिकांची धांदल
या वाऱ्यासह पाऊसही मोठ्या प्रमाणात आला. या वादळी पावसात अनेकांच्या घराचे छप्पर उडून गेले. घरातील अन्नधान्यासह इतर साहित्य भिजून नुकसान झाले. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील धुळा महानवर, अशोक ढोपरे, बाळू नाळे, दादा गायकवाड, मंदा लोंढे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच गावातील विजेचे खांब कोलमडल्याने गावातील वीज खंडित झाली. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील वनिता लव्हे यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना कळविली असून तलाठी सुरेश जगताप यांना तहसीलदारांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बाबुर्डी गावात झालेल्या वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य आणि इतर वस्तूंचे ही नुकसान झाले आहे. याबाबतचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. अशी माहिती बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी दिली.