बारामतीत EVM ठेवलेल्या गोदामाचे CCTV बंद; शरद पवार गटाची तक्रार, अधिकारी म्हणतात…

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मतदान झालेले ईव्हीएम मशीन ज्या गोदामात ठेवण्यात आले होते. तिथले सीसीटीव्ही बंद पडले आहेत. यामुळे निकालात काहीतरी फेरफार होऊ शकतो असा संशय खासदार सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी वर्तवला आहे. आज सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी हे सीसीटीव्ही बंद पडले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड या भागात ईव्हीएम चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी चोरांना अटक देखील केली होती. परंतु या प्रकरणानंतर पोलिसांवर संशय व्यक्त केला होता. तसाच प्रकार बारामती लोकसभा मतदानाच्या दिवशी घडला होता. पीडीसीसी बँक पहाटे चारपर्यंत उघडी असल्याचं आढळून आलं होतं. इंदापूर येथे पैसे वाटल्याचे व्हिडीडिओ समोर आले होते. स्थानिक आमदार दत्ता भरणे हे एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करत होते, याचा व्हिडिओ ही व्हायरल झाला होता. त्यानंतर आज पुण्यात कोरेगाव पार्क येथे गोदामातील सीसीटीव्ही बंद पडलेले आढळले आहेत. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काहीतरी काळंबेरं झाल्याचा संशय राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मीकांत खाबिया यांनी व्यक्त केला आहे.
मोदींचे महाराष्ट्र दौरे यंदा का वाढलेत? शिंदे, ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांनी सांगितलं कारण
बारामती लोकसभा मतदारसंघात अतिशय अतितटीची लढत झाली. शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत असल्यामुळे अवघ्या राज्यासह देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे. मतदानापूर्वी या मतदारसंघात घडलेल्या घडामोडी चर्चेत राहिल्या. मात्र मतदान झाल्यानंतरही गोंधळ सुरूच आहे.
तुम्हीच अजित पवारांवर आरोप केले, मग आता त्यांना सोबत का घेतलं? फडणवीसांनी टाईमलाईन सांगितली
राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी सीसीटीव्ही बंद असल्याची बाब समोर आणली आहे. रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. तब्बल ४५ मिनिटं सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. या वेळेत काळंबेरं घडल्याचा संशय त्यांनी बोलून दाखवला.

या घटनेवर बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी माहिती दिली. बारामतीमधील गोदामातील कॅमेरे बंद असल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. याबद्दल सविस्तर चौकशी केली. इलेक्ट्रिशननं काम करताना अल्प कालावधीसाठी एक केबल काढली होती. त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हतं. मात्र सर्व कॅमेरे सुरु आहेत. सर्व डेटा सुरक्षित आहे. आता कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आता सर्व प्रक्षेपण टीव्ही युनिटवर दिसत आहे, असं द्विवेदी यांनी सांगितलं.