बारामतीत प्रचार सांगतेचा ‘सुपर संडे’; दोन्ही पवारांच्या आज स्वतंत्र सभा, कोण काय बोलणार?

प्रतिनिधी, पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि कौटुंबिक आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज, रविवारी थंडावणार आहेत. शरद पवार आणि अजित पवार या दोघांची प्रचाराची शेवटची सभा बारामतीत वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.बारामती मतदारसंघामध्ये येत्या मंगळवारी (७ मे) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, जयंत पाटील, संजय राऊत, आदित्य ठाकरे, राजेश टोपे, भास्कर जाधव, रोहित पवार, रोहित पाटील या नेत्यांनी सभा घेतल्या. सुनेत्रा पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, हर्षवर्धन पाटील, धनंजय मुंडे, रामदास आठवले, दत्तात्रय भरणे, महादेव जानकर, बाबा सिद्दिकी, चित्रा वाघ आदींनी सभा घेतल्या आहेत. या सभांमधून एकमेकांवर आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर विकासाच्या मुद्यांवर मते मागण्यात आही.

प्रचार सांगतेचा ‘सुपर संडे’

प्रचार सांगतेनिमित्ताने सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार हे सकाळी नऊ वाजता भोर येथे, दहा वाजता इंदापूर येथे आणि बारामतीत दुपारी एक वाजता शेवटची सभा घेणार आहेत. दरवर्षीचे मैदान उपलब्ध न झाल्याने बारामतीतील जुना मोरगाव रस्त्यावरील लेंजी पट्टी या मैदानावर पवार हे बारामतीसाठीची अखेरची सभा घेतील. तर, दौंड तालुक्यातील वरवंड येथे सकाळी साडेअकरा वाजता तसेच बारामतीतील मिशन बंगला समोरील मैदानावर दुपारी साडेतीन वाजता सुनेत्रा पवार यांच्यासाठी शेवटची प्रचाराची सभा अजित पवार घेणार आहेत. तत्पूर्वी शारदा प्रांगण ते मिशन बंगला मैदानापर्यंत दुपारी बारा वाजता पदयात्रा काढण्यात येणार आहे.
आता लढाई ‘मैदाना’त, पुतण्याचा काकांना धक्का; ४० वर्षांची परंपरा खंडित, काकांनी मार्ग शोधला
दोन्ही पवारांच्या स्वतंत्र सांगता सभा

गेल्या कित्येक वर्षात शरद पवार विधानसभा असो की लोकसभेच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीतील मिशन बंगला मैदानावर घेतात, हा इतिहास आहे. आतापर्यंतच्या प्रचार सांगता सभांमध्ये दोन्ही पवार एकाच व्यासपीठावर असायचे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे दोन्ही पवार स्वतंत्रपणे सभा घेणार आहेत.

‘नरेंद्र मोदी यांनी तरी कुठे कुटुंब सांभाळले? त्यांची कौटुंबिक परिस्थिती तर अतिशय चिंताजनक आहे.’- शरद पवार, जळगावमधील सभेत