बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळाली. मात्र या लढतीला अनेक पदर होते. कारण इथे फक्त सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार किंवा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई नव्हती. तर काका शरद पवार विरुद्ध बंडखोर पुतण्या अजित पवार असाही सामना होता. किंवा अजितदादांच्या सांगण्यानुसार नरेंद्र मोदी विरुद्ध राहुलं गांधी अशी लढत होती.
एक्झिट पोलनुसार बारामती लोकसभा मतदारसंघात नणंदबाई बाजी मारण्याची चिन्हं आहेत. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आपली जागा टिकवण्याची शक्यता आहे. सुळे विजयी झाल्यास हा त्यांचा सलग चौथा विजय असेल.
महत्त्वाचं म्हणजे, सुनेत्रा पवार यांचा पराभव ही अजित पवार यांच्यासाठी मोठी नामुष्की असेल. शरद पवार यांच्याविरोधात बंड करत अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेतला होता. त्यानंतर थेट भगिनी सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात पत्नीलाच उतरवत परिवारातली लढाई निर्माण केली. हे पुतण्याने काकांना, भावाने बहिणीला दिलेलं चॅलेंज होतं. मात्र त्यात शरद पवारांना यश आल्यास अजितदादांसाठी मोठा फटका असेल.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
विशेष म्हणजे, गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरलेले अजित पवार याचे सुपुत्र पार्थ पवार हे पराभूत झाले होते. त्यानंतर आता अजितदादांच्या पत्नीही पराभूत झाल्यास आपल्याच कुटुंबातील दोघांना निवडून आणण्याची ताकदही अजित पवार यांच्यात नसल्याचा मेसेज जाईल. त्यामुळे हा पराभव अजित पवारांना जिव्हारी लावणारा असेल.