भरधाव कारने अंगावर गाडी घातली
केदार मोहनराव चव्हाण (वय ४१, रा. धनकवडी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चेतन चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कारचालक नंदू अर्जुन ढवळे (वय ५७, रा. सातववाडी) याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
केदार हा एका कुरिअर कंपनीत पार्सल डिलिव्हरी करण्याचे काम करीत होता. चार महिन्यांपूर्वीच तो नोकरीला लागला होता. कंपनीचे स्वारगेट परिसरात कार्यालय असून, मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे केदार कार्यालयात गेला होता. विमानतळावर कुरिअर डिलिव्हरी करायची असल्याने तो दुपारी स्वतःची दुचाकी घेऊन निघाला. येरवडा गोल्फ चौकात सिग्नल सुटल्यावर विमानतळाच्या दिशेने जात असताना गोल्फ कोर्स प्रवेद्वाराच्या पुढे गेल्यावर केदार दुचाकीवरून अचानक रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने त्याच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. कारचालकाने तातडीने केदारला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. येरवडा पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
चव्हाण कुटुंबावर शोककळा
केदार चव्हाण याच्या वडिलांच्या लहानपणी मृत्यू झाला. आईने घरकाम करून केदार, त्याचा भाऊ आणि तीन बहिणींचा सांभाळ केला. केदारने कष्ट करून तिन्ही लहान बहिणींचा विवाह करून जबाबदारी पार पाडली. मागील काही काळापासून घरचे केदारच्या विवाहासाठी स्थळ शोधत होते. घरातील कमावता मुलगा गेल्याने चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.