बड्या नेत्यासोबत बैठक, दोन जागांचा आग्रह; भुजबळ घरवापसीच्या तयारीत, अजितदादांची साथ सोडणार?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण महायुतीत नाशिकची जागा शिंदेसेनेकडे गेल्यानं भुजबळांना संधी मिळाली नाही. त्यानंतर ते राज्यसभेवर जाण्यास उत्सुक होते. पण पक्षानं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना संधी दिली. विशेष म्हणजे लोकसभेतील पराभवानंतर अवघ्या १० दिवसांत सुनेत्रा यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. या सगळ्या घडामोडींमुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा आहेत. भुजबळ ठाकरेसेनेच्या संपर्कात असल्याचं कळतं.

ठाकरेसेनेतील एका वरिष्ठ नेत्यानं गेल्याच आठवड्यात भुजबळांची भेट घेतल्याचं वृत्त इंडिया टुडेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. ओबीसी समाजाचे नेते असलेल्या भुजबळांना दिल्लीत काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठीच ते लोकसभा, राज्यसभेची निवडणूक लढण्यास आग्रही होते. पण दोन्ही वेळा त्यांना संधी मिळाली नाही. समता परिषदेचे अध्यक्ष असलेल्या भुजबळांनी नुकतीच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे वेगळा निर्णय घेण्याबद्दल आग्रह धरला. मात्र पक्षात नाराज असल्याची चर्चा भुजबळांनी फेटाळून लावली.
Chhagan Bhujbal: भुजबळांची ‘समता’ खेळी, नेमकी कोणावर कुरघोडी? मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जुन्या पक्षात परतणार?
सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि भुजबळांमध्ये प्राथमिक स्वरुपाची चर्चा झाली आहे. पक्षात ज्येष्ठतेनुसार स्थान मिळावं, अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली. याशिवाय त्यांनी स्वत:साठी येवला आणि पुतण्या समीर भुजबळांसाठी नांदगाव विधानसभा मतदारसंघ सोडण्यात यावा अशी मागणी केली. नांदगावमध्ये शिंदेसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत.
दोघात नको तिसरा, आता दादांना विसरा! भाजपमध्ये वाढतंय ‘त्या’ नेत्यांचं बळ, NCPसाठी वाट अवघड
राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या नेत्यांसोबत पक्षांतराबद्दलच्या चर्चा उघडपणे होत नसतात. त्या चार भिंतीमध्ये होत असतात, असं ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेना सोडून गेलेले कोणीही आनंदी किंवा समाधानी नाहीत. भुजबळ शिवसेनेत राहिले असते, तर त्यांच्या कपाळी मुख्यमंत्रिपदाचा टिळा लागला असता. शिवसेना सोडून गेलेले सगळेच, मग ते नारायण राणे असो वा एकनाथ शिंदे, आता भटकती आत्मा बनून फिरत आहेत, असं राऊत यांनी म्हटलं.

लोकसभेत ९ जागा जिंकणाऱ्या ठाकरेसेनेनं विधानसभेची तयारी सुरु केली आहे. भुजबळांच्या येवला मतदारसंघातून कुणाल दराडेंना ठाकरेसेनेकडून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. दराडेंनी विधानसभेची तयारीदेखील सुरु केली आहे. भुजबळांनी ठाकरेसेनेत प्रवेश केल्यास स्थानिक पातळीवर असंतोष निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे आज शिवसेनेचा स्थापनादिन आहे. त्याचवेळी भुजबळांच्या घरवापसीची चर्चा सुरु झाली आहे.