बचावकार्य अखेर संपुष्टात, कोसलळेल्या होर्डिंगखालून तब्बल ७१ वाहने बाहेर काढली

प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपरमधील छेडा नगरमध्ये जाहिरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. या घटनेतील मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १६वर पोहोचली आहे. होर्डिंगचे सुटे भाग आणि राडारोडा हटवण्याचे कार्य पूर्णत्वाकडे असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली असून, ती मृतांच्या नातेवाइकांकडे लवकरच पोहोचवण्यात येणार असल्याचेही आयुक्त गगराणी यांनी सांगितले. कोसळलेल्या होर्डिंगच्या खालून ७१ वाहने बाहेर काढण्यात आली आहेत.घाटकोपरमधील घटनास्थळाला महापालिका आयुक्त गगराणी यांनी गुरुवारी भेट दिली आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनास्थळी बचावकार्यासाठी मुंबई महापालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलिस, एमएमआरडीए, एनडीआरएफ, हिदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, महानगर गॅस लिमिटेड यांच्यासह विविध शासकीय आणि बाह्य यंत्रणांचा समावेश होता, असे गगराणी यांनी सांगितले. घटनास्थळी अन्य कोणतीही व्यक्ती अडकली नसल्याची तपासणी करण्यात आली असून या पाहणीअंती बचावकार्य पूर्ण झाले आहे. जाहिरात होर्डिंग कापून केलेले सुटे भाग; तसेच इतर राडारोडा इत्यादी हटविण्याचे काम निरंतर सुरू आहे. हे कामदेखील आता पूर्णत्वाकडे असल्याचे ते म्हणाले.
Chhagan Bhujbal: भुजबळ नाराज, गोडसेंच्या प्रचारात दिसेनात; जयंत पाटलांनी ‘जनाधार’ काढला, तटकरेंकडून सारवासारव

मुंबईतील जाहिरात होर्डिंगसंदर्भात कोणत्या स्वरूपाची कारवाई करायची यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जाहिरात होर्डिंग कोणत्याही जागी असोत किंवा कोणाच्याही मालकीची असोत, महापालिकेच्या आवश्यक मानकानुसारच जाहिरात फलक उभारणे गरजेचे असल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले. यामध्ये फलकाचा आकार, पाया, संरचनात्मक स्थिरता, वाऱ्याचा प्रतिरोध टाळण्यासाठी संरचनात्मक व्यवस्था या सर्वांची मानके ठरवून देण्यात आली आहेत. महापालिकेच्या परवानगी घेतलेल्या फलकांसाठी संरचनात्मक स्थिरता परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच मुंबईतील महापालिकेच्या परवानाधारक जाहिरात होर्डिंगची खबरदारी म्हणून पुन्हा एकदा विभागस्तरावर पडताळणी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेने सर्व मानकांचे पालन करावे

मुंबई महापालिकेनेही रेल्वे प्रशासनालाही त्यांच्या हद्दीतील जाहिरात होर्डिंगच्या संरचनात्मक स्थिरता पडताळणीसाठी निर्देश दिले आहेत. रेल्वेकडूनही जाहिरात होर्डिंगच्या आवश्यक त्या मानकांचे पालन होणे गरजेचे आहे. या मानकाचे पालन न करणारे कोणतेही जाहिरात होर्डिंग असतील तरी ते हटवले पाहिजेत. रेल्वे प्रशासनच नव्हे; तर अन्य कोणत्याही जागेत जाहिरात होर्डिंगसाठी लागू असलेल्या मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुन्हा दाखल

छेडानगरमधील जाहिरात होर्डिंग दुर्घटना प्रकरणी दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्यांनी संरचना स्थिरतेबाबत प्रमाणपत्र दिले होते, त्यांच्याकडून महापालिकेने स्पष्टीकरण मागवले आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

पेट्रोलपंपाच्या परवानगीची तपासणी

मुंबईत कोणत्याही व्यवसायासाठी मुंबई महापालिकेचा विहित परवाना आवश्यक आहे. त्यानुसार घटनास्थळावर असलेल्या पेट्रोलपंपच्या बांधकामासाठी तत्त्वत: परवाना देण्यात आला होता. पेट्रोलपंप चालवण्याचा विहित परवाना संबंधिताना प्राप्त केलेला होता की नाही, आदी बाबतची तपासणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यानुसार परवाना नसल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

७१ वाहने बाहेर काढली

कोसळलेल्या जाहिरात होर्डिंगखाली मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर आलेली तसेच पावसामुळे आडोशाला उभी असलेली वाहने आली. गुरुवारपर्यंत ७१ वाहने बाहेर काढण्यात आली आहेत. यामध्ये ३० दुचाकी, ३१ चारचाकी, आठ रिक्षा आणि दोन ट्रकचा समावेश आहे.