फडणवीस राजीनाम्याच्या मनस्थितीत, सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या, नेत्यांची धावाधाव

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेत काम करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती पक्षनेतृत्वाला करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या तयारीनंतर महाराष्ट्र भाजपमध्ये स्फोट झाला असून वरिष्ठ नेत्यांनी फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर धाव घेतली आहे.महाराष्ट्र भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास १४ जागांचा तोटा झाला आहे. विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्येच पक्षाला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे केंद्रातील रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील या आजी मंत्र्यांचा, सुभाष भामरे या माजी मंत्र्यांचा, तर राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. गेल्या अनेक वर्षातील भाजपचा महाराष्ट्रातील हा सर्वांत मोठा पराभव आहे. या पराभवाचे पडसाद पक्षात उमटणे सुरू झाले आहे.
मला सरकारमधून बाहेर पडण्याची परवानगी द्या, संघटनेसाठी काम करून उणिवा भरून काढेन : देवेंद्र फडणवीस

सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची धाव

भाजपच्या पराजयानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक संपन्न झाली. भाजपने गमावलेल्या जागांवरील विधानसभा निहाय आढावा शीर्षस्थ नेत्यांकडून घेण्यात आला. त्याचवेळी महायुतीचे भाग असलेले शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची किती प्रमाणात मदत झाली, याचीही माहिती भाजप नेत्यांनी घेतली. त्यानंतर बुधवारी दुपारी फडणवीस यांनी पराभवाची विविध कारणे सांगताना नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची तयारी दर्शवली. फडणवीस यांच्या टोकाच्या पावलानंतर संघटनेत अस्वस्थता पसरली असून पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री विखे पाटील तसेच प्रसाद लाड आदी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांनी सरकारबाहेर जाऊ नये, यावर सगळ्या नेत्यांचे एकमत झाले.

त्यानंतर सर्व नेते फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. फडणवीस यांनी राजीनाम्याचा विचार करू नये. सरकारमध्ये राहून पक्षसंघटनेला शक्य तितका वेळ द्यावा. तसेच इतर सहकाऱ्यांना मार्गदर्शन करून पक्षसंघटना वाढीकडे लक्ष द्यावे, अशी विनंती भाजप नेत्यांनी फडणवीस यांना केली आहेत. यावर फडणवीस काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.