नरेंद्र मोदी यांनी पुणे, सातारा व सोलापूर येथे सोमवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांना धारेवर धरले. ‘काँग्रेसला राज्यघटना बदलू देणार नाही’, अशी ग्वाही देत ‘इंडिया आघाडी’चे लोक ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली धूळफेक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘एका मोठ्या नेत्याने ४५ वर्षांपूर्वी महत्त्वाकांक्षेसाठी सुरू केलेल्या खेळाने महाराष्ट्रात अस्थिरतेचा कालखंड सुरू झाला. त्यामुळे अनेक मुख्यमंत्री कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. या ‘भटकत्या आत्म्या’ने १९९५ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला; तसेच २०१९ मध्येही जनादेशाचा अवमान केला. महाराष्ट्र या आत्म्याला बळी पडला असून, आता देशही अस्थिर करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याने आपला पक्ष आणि कुटुंबही अस्थिर केले आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पुण्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर नाव न घेता हल्ला चढविला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
अजित पवार यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर व त्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुक्रमे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे चिन्ह असलेली फ्रेम मोदी यांना भेट दिली. शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले यांनी मोदी यांचे स्वागत केले.