ललनटॉपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यावेळेचा किस्सा सांगितला आहे. ३० जून २०२२ रोजी भाजप आणि शिंदे गट शिवसेनेने मिळून सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. ते या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. तरीही त्यांनी नंतर हे पद स्विकारलं. यामागे काय कारण होतं?
“जेव्हा आम्ही शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझं मत होतं की शिंदेंना मुख्यमंत्री करावं. मी त्यांच्याशी चर्चा केली आणि नंतर आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत बोललो. त्यांना वाटले की आमच्याकडे ११५ जागा आहेत, तर हे कसं होऊ शकतं. मात्र, नंतर हायकमांडलाही वाटलं की या निर्णयामुळे शिंदे गटातील लोकांचा विश्वास वाढेल. त्याशिवाय, असाही संदेश जाईल की जर आपण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन दिले असते तर त्यांनाही केले असते. ज्यावेळी हा निर्णय झाला, त्याच क्षणी मला सरकारमधून बाहेर ठेवा असं मी पक्षाला सांगितले. म्हणजे लोकांना मी लोभी नेता आहे, काही काळापूर्वी मुख्यमंत्री होते आणि आता सत्तेच्या लालसेपोटी उपमुख्यमंत्री किंवा मंत्रीपद स्वीकारले, असं वाटायला नको, म्हणून मी हा निर्णय घेतला होता, असं फडणवीसांनी सांगितलं.
त्यावेळी पक्षाने त्यांचा निर्णय मान्य केला, पण शपथविधीच्या दिवशी आधी अमित शहा आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना फोन करत उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्याची विनंती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना म्हणाले, नेता म्हणून तुमचा याविषयी संभ्रम असू शकतो, पण कार्यकर्ता म्हणून नसावी. कारण, तुम्ही पक्षाचे नेते आहात आणि कोणतंही सरकार बाहेरून चालवले जात नाही. घटनाबाह्य अधिकाराने चालवलेले सरकार आम्हाला मान्य नाही. हे सरकार व्यवस्थित चालले पाहिजे, तुम्हाला अनुभव आहे आणि आपण सर्वात मोठा पक्ष आहोत. या सरकारला आपल्याला चालवायचं आहे आणि त्यासाठी आपली उपस्थिती आवश्यक आहे, असं फडणवीसांनी सांगतिलं.
काहीशा निराशेसोबत ही ऑफर स्वीकारल्याचं फडणवीस म्हणाले. मात्र, त्यानंतर पंतप्रधानांनी या विषयावर ट्विट केल्यावर त्यांना देशभरातून नेते आणि कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले. त्यांनी केलेल्या त्यागाचा अभिमान वाटतो, असे सगळे त्यांना फोन करून सांगत होते, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे आपला निर्णय चुकलेला नाही, असं मला वाटलं, असंही ते म्हणाले.