निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची सरमिसळ करण्यात आली असून, ७५ टक्के मतदान यंत्रांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, दिव्यांग, युवा, वैशिष्ट्यपूर्ण (युनिक) आणि आदर्श अशा मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारामती मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणुकीच्या अनुषंगाने साहित्याचे आज, सोमवारी सकाळी वितरण होणार आहे.
नाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त
बारामतीसाठीचा प्रचार रविवारी सायंकाळी सहा वाजता संपला. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी शहराच्या बाहेर नाक्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे; तसेच पैसे, दारूचे वाटप होणार नाही यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. मंगल कार्यालयांसह हॉटेलमध्ये होणाऱ्या पार्ट्यांवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मतदारसंघातून १८ लाखांची रक्कम आणि सुमारे ९७ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
मतदान केंद्रातील सुविधा
– गर्भवती, वृद्धांसाठी मतदान केंद्रावर प्रथमच प्रतीक्षालय
– मतदारांना उन्हाचा फटका बसल्यास ‘ओआरएस पॅकेट्स’
– शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा
– दिव्यांगासाठी रॅम्पची सुविधा
मतदान केंद्रांवर मंडप
यंदा उन्हाळा खूप जास्त आहे. त्याची तीव्रता लक्षात घेता आणि मतांचा टक्का वाढावा यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मंडप टाकण्यात आले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा जास्त मतदान केंद्रे असणाऱ्या मतदान केंद्रांवर हे मंडप उभारण्यात आले आहेत. खडकवासला मतदारसंघात सर्वाधिक पाच किंवा त्यापेक्षा अधिक अशी मतदान केंद्रे आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात २५१६ मतदान केंद्रे असून, त्यापैकी १३५ केंद्रांवर मंडप टाकले असल्याची माहिती कविता द्विवेदी यांनी दिली.