धक्कादायक म्हणजे पोर्शे कारमध्ये एका आमदाराचा मुलगा अपघातावेळी होता, असा दावाही पटोलेंनी केला आहे. अपघातग्रस्त गाडीतून दोघं जण उतरले, ते कोण होते, याचा खुलासा व्हायला हवा. यात एका आमदाराच्या मुलाचाही सहभाग आहे, त्याचंही नाव समोर यायला हवं, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार हुसेन दलवाई आदी मान्यवर उपस्थित होते. नाना पटोले म्हणाले की, राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे. तर, दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करून सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या. पण, यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले, हा अत्यंत संताप आणण्याचा प्रकार आहे. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचविण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही, असा आरोप त्यांनी केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘तरुण पिढीचे भाजपकडून नुकसान’
पुण्यातील घटनेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकिलीचा वापर आरोपींना वाचविण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरू आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पब सर्रास सुरू आहेत. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील ३६ अवैध पब पाडावे लागले. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढीचे नुकसान करण्याचे पाप भाजपने केले आहे, असा आरोप त्यांनी केला.