संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘खासदार शाहू महाराज, प्रकाश आंबेडकर हे माझ्याबद्दल काय बोलले आहेत हे मला माहिती नाही. मात्र, आजी-माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे कधी किल्ल्यावर गेले आहेत का, त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांसाठी काय केले आहे, याचे उत्तर द्यावे. या ठिकाणी दोन्ही धर्मातील १५८ अतिक्रमणे असल्याचे सिद्ध झाले आहे. दीड वर्षांपूर्वी ही अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतर लगेचच कोणी तरी लोकप्रतिनिधींनी खो घातला. या कारवाईस कोर्टाची स्थगिती असल्याचे भासविण्यात आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी १५८ पैकी केवळ सहा ते सात अतिक्रमणांना स्थगिती असल्याचे सांगितले; तसेच यावर वर्षभर सुनावणी झाली नव्हती. कारवाई न होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव टाकला होता.’
‘विशाळगडावर खुला कत्तलखाना सुरू होता. येथेच बकरे, कोंबड्या कापल्या जात होत्या, त्यांचे रक्त-मांस तेथे वाहत होते. गडावर मद्यपान, पार्ट्या सुरू होत्या. येथील अतिक्रमण काढण्यासाठी कोर्टात वर्षभरात एकही सुनावणी घेण्यात आली नाही. त्यानंतर येथील अतिक्रमण काढण्यासाठी मी आक्रमक होऊ नये का? जर्मन बेकरीसह अनेक बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी यासीन भटकळ या गडावर राहिला आहे. यावर हसन मुश्रीफ, सतेज पाटील काही बोलत नाहीत. यामध्ये माझी चूक काय,’ असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
जाळपोळीचे समर्थन नाहीच
अतिक्रमण काढण्यास उशीर का केला? त्यावर वेळीच निर्णय का घेतला नाही? अशी विचारणा करीत संभाजीराजे छत्रपती यांनी गजापूर येथे झालेल्या जाळपोळीचे समर्थन कधीही करणार नसल्याचे सांगितले. ही अतिक्रमण कारवाई वेळीच झाली असती, तर ही वेळच आली नसती. प्रशासनाने दोन दिवसांत सुमारे १०० अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. याबाबत शिवभक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करतो. गडांवरील अतिक्रमणे हा विषय धर्माच्या पलीकडील आहे. सर्व गड, किल्ले हे अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत आणि इतर किल्ल्यांवर कारवाईचे धाडस दाखविले पाहिजे, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.