आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम पुन्हा हाती घेतला आहे. त्याअंतर्गत मोठ्या संख्येच्या सदनिका असलेल्या सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी सोसायट्यांनी सहकार्य करावे; तसेच रहिवाशांसाठी निवासाजवळ मतदान केंद्र उपलब्ध व्हावीत, यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक
सहकार विभागाने सोसायट्यांच्या अध्यक्ष आणि सचिवांना मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून जाहीर केले आहे. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सोसायट्यांतील मतदार नोंदणीस पात्र होणारे रहिवासी, सोसायटीतील जागा सोडून गेलेल्या व्यक्ती आणि मयत व्यक्ती यांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना द्यावी. त्याप्रमाणे सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांनी रहिवाशांना मतदार नोंदणी आणि दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करावे, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
सोसायट्यांनी काय करावे?
शहरातील सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र सुरू करण्यासाठी सोसायटीने सोसायटीचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, अंदाजित मतदारसंख्या आदी माहितीसह आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्या करिता मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या http://ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवर https://forms.gle/twLTGpjzzy2x9eV36 व https://forms.gle/z261Ah4DDgQxSEvs9 या गुगल लिंकवर आपला अर्ज भरता येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
५० सोसायट्यांमध्ये आणखी केंद्रे वाढतील
पुणे शहरात सध्या २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सुमारे ३५ सोसायट्यांमध्ये सध्या मतदान केंद्रे कार्यान्वित आहेत. आता मतदान केंद्रांची पुर्नरचना करण्यात येणार आहे. त्याकरिता मतदारयाद्यांनुसार एकाच ठिकाणचे मतदार जवळच्या मतदान केंद्रात येऊ शकतील, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. त्यामुळे आणखी ५० ते ६० सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे वाढतील, अशी अपेक्षा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी व्यक्त केली. सोसायट्यांमध्ये असलेले रहिवाशी विविध केंद्रांवर मतदान करणारे असल्यास त्या सोसायट्यांमध्ये केंद्र कार्यान्वित करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.