पुणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानास सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. पुण्यात महायुतीतर्फे भाजपकडून मुरलीधर मोहोळ, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत. सकाळी सात पासून नऊ वाजेपर्यंत म्हणजे दोन तासात ६.६१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे पुणेकर मतदानाकडे पाठ फिरवतात का, अशी काहीशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र भर दुपारी पुणे कॅम्प, टिंबर मार्केट परिसरात मतदानासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सकाळपासून घसरलेला मतदानाचा टक्का दुसऱ्या सत्रात काहीसा सावरण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील तापमान सध्या ३३ अंशाच्या आसपास असले, तरी हवेत प्रचंड उष्मा जाणवत आहे. त्यामुळे सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत मतदान आटोपण्याकडे बहुसंख्य मतदारांचा कल राहील, असा अंदाज होता. दुपारच्या वेळेस टळटळीत उन्हात मतदार बाहेर पडण्याची शक्यता कमी दिसत होती. मात्र काही जेवण आटोपून मतदानाला बाहेर पडत असल्याचं दिसत आहे.
पुणे लोकसभा
दुपारी तीन वाजेपर्यंत
एकूण मतदान – 34.07%
कसबा पेठ – 35.23%
कोथरूड – 37.2%
पर्वती – 38.1%
पुणे कॅन्टोन्मेंट – 31.5%
शिवाजीनगर – 26.61%
वडगाव शेरी – 29.27%
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.६१ टक्के, तर दुपारी एक वाजेपर्यंत २६.४८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुसरीकडे, मावळ लोकसभा मतदारसंघातही सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत २७.१४ टक्के मतदान झाले. मावळच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये हा टक्का कमी असल्याचे निवडणूक आयोगाचे मत आहे. सकाळच्या टप्प्यामध्ये अल्प प्रतिसाद, निरुत्साह दिसून आला.