केंद्रात मंत्रिपद मिळेल असे वाटले होते का?
– भारतीय जनता पक्षात बूथपातळीपासून शहर पक्ष संघटना, नंतर महापालिका, राज्य संघटना या विविध पातळ्यांवर मी काम केले आहे. माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला सुजाण पुणेकरांनी लोकसभेवर पाठविल्यावर केंद्रातही मंत्रिपदाची संधी मिळेल, असे मला तरी वाटले नव्हते. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा त्या दिवशी सकाळी आलेला दूरध्वनी माझ्यासाठी सुखद धक्का होता; पण जेव्हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलो, तेव्हा पुन्हा खात्री पटली, की सामान्य कार्यकर्त्याचा योग्य सन्मान करणारा आमचा भाजप वेगळा पक्ष आहे.
अमित शहांबरोबर काम करण्याचे दडपण वाटते का ?
– निश्चितच. मंगळवारी सहकार राज्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी गेलो, तेव्हा शहा तिथेच होते. त्यांचे आशीर्वाद घेतल्यावर ते म्हणाले, की तुम्ही सहकाराच्या राज्यातून आले आहात. चांगले काम करा. शहा यांनी पाठीवर हात ठेवताक्षणी सारा तणाव दूर झाला व कामाचाही हुरूप आला. शहा यांची प्रशासनावरील जबरदस्त पकड अभ्यासणे हीदेखील माझ्यासाठी शिकण्याची संधी आहे.
दोन्ही मंत्रालयांतर्गत राज्यांच्या प्रकल्पांसाठी कोणता आराखडा आहे ?
– महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावणे हे माझ्यासमोरचे ध्येय आहे. उदा. उडान योजनेत सोलापूरसारख्या अनेक विमानतळांबाबत काही अडचणी आहेत. त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न मी करीन. पुण्यातील सध्याच्या लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यास प्राधान्य असेल. या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींकडूनही माहिती घेऊन केंद्रीय पातळीवर काय करता येईल, याचा आराखडा तयार केला जाईल. नवी मुंबई विमानतळही लवकरच सुरू होणार आहे. पुणे-नवी मुंबई थेट रेल्वे सुरू करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. मुळा-मुठा नदी काठाचे सौंदर्यीकरण, विकास प्रकल्पांसाठी प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री असताना केंद्राकडून पुण्याला १००० कोटी रुपयांचा निधी ‘जायका’मार्फत मिळाला होता. त्यावरही काम सुरू आहे.
पुण्यात नुकतीच एका पावसाने जागोजागी तळी साचली…
– सतत वाढणाऱ्या, विस्तारणाऱ्या पुण्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करणे ही काळाची गरज आहे. त्या दिशेने केंद्रीय मंत्रिपदाचा उपयोग झाल्यास मी स्वत:ला भाग्यवान समजेन. दिल्लीत आल्यादिवशीच मी पुण्यात पावसाळी पाण्याच्या निचऱ्याच्या समस्येवर महापालिकेतील संबंधितांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. महापौर म्हणून काम केले असल्याने या प्रश्नाच्या गांभीर्याची कल्पना आहे. पुण्यात संपूर्ण जून महिन्यात सरासरी १५० मिलिमीटर पाऊस पडतो. त्या दिवशी केवळ दोन तासांत ११३ मिमी पाऊस पडला. एखाद्या महानगरात दोन तासांत महिनाभराचा पाऊस पडला तर काही समस्या उद्भवणारच. अर्थात, याचा अर्थ असा नाही, की या सबबीखाली काही उपायच करायचे नाहीत. पाण्याचा निचरा न होणाऱ्या किमान १२७ जागा शोधल्या आहेत. तिथे तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुण्यातल्या भीषण वाहतूक कोंडीबाबत काय करणार?
– पुण्यात वाहतुकीचा प्रश्न आहे हे अमान्य करण्याचे काहीच कारण नाही. माझ्याआधीच्या दोन्ही खासदाारंनीही यावर काम केलेले आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे हाच त्यावरील प्रभावी उपाय ठरेल. मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार, शहर बस वाहतुकीमध्ये सुधारणा, नागरिकांच्या सहभागातून जुन्या वाड्यांचा पुनर्विकास, भूसंपादनाचा प्रश्न सोडवून दोन्ही कँटॉन्मेंट बोर्डांचे महापालिकेत विलीनीकरण याला प्राधान्य देण्यात येईल. केंद्र सरकारसोबत समन्वय साधून हा मुद्दा तातडीने सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. पीएमपीएमएल आणि मेट्रो यांच्यातील समन्वय वाढवून दिल्लीच्या धर्तीवर मेट्रो आणि शहर बससेवेसाठी एकच स्मार्ट कार्ड वापरता येईल का, यावरही मी काम करणार आहे.
– कल्याणीनगरमध्ये मद्यधुंद धनदांडग्याने पोर्श कारने दोन निष्पाप तरुणांना चिरडल्याच्या प्रकरणात तीव्र संताप आहे. त्याबद्दल काय सांगाल?
– यात सरकारी यंत्रणांकडून अधिकारांचा गैरवापर झाला हे नक्की; पण राज्य सरकारने तातडीने यंत्रणा हलवली व संबंधित सर्व जण गजाआड जातील याची खातरजमा केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पुण्यात तळ ठोकून बसले. आरोपींवर कारवाईला गती आली. संबंधित कुटुंबीय, ‘ससून’चे अधिकारी, पोलिस अधिकारी आदींवर कडक कारवाई करण्यात आली आहे.