पुण्यातील प्राईम मतदारसंघासाठी मविआत रस्सीखेच, ठाकरे गटाकडून सांगली पॅटर्नची चर्चा

पुणे : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. महायुतीमधून दोन उमेदवार तर महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमधील तीन तगडे उमेदवार पुण्यातील एकाच मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सांगली पॅटर्न होण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

महायुतीमध्ये रस्सीखेच

पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधून विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यासह योगेश टिळेकर आणि नाना भानगिरे इच्छुक होते. टिळेकरांची वर्णी विधान परिषदेवर लागल्यानंतर विद्यमान आमदार चेतन तुपे आणि शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यात खेचाखेच होण्याची शक्यता आहे.

खरं तर चेतन तुपे आणि मित्रपक्षांनी काम करूनही लोकसभेचे अजितदादा गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हडपसर मतदारसंघातून लीड मिळू शकलेली नव्हती. त्यामुळे काहीशी नाराजी तुपेंबाबत होती. परंतु तरीही विधानसभेला आपल्याला पुन्हा संधी मिळेल, असा पूर्ण विश्वास चेतन तुपे यांना आहे.

महाविकास आघाडीतही संघर्षाचा सूर

दुसरीकडे, महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसकडून बाळासाहेब शिवरकर इच्छुक आहेत. हडपसर काँग्रेस कमिटीने यंदा तरुण उमेदवार देण्याची विनंती केली आहे. परंतु शिवकर पक्ष अध्यक्षांची भेट घेत संधी देण्याची विनंती करत आहेत.
Chhagan Bhujbal : ना मला राजकारणाची पर्वा, ना मंत्रिपद, ना आमदारकीची, पवारांच्या भेटीचं गूढ भुजबळांनी उलगडलं

ठाकरे गटाकडून हडपसरमध्ये सांगली पॅटर्नची चर्चा

सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊनही काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष उभे राहिले आणि त्यांनी लोकसभा निवडणूक मारली. त्याच प्रमाणे हडपसर विधानसभेमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला तिकीट मिळालं नाही, तर अपक्ष उभ राहून निवडणुका लढवणार, अशी महादेव बाबर यांची तयारी असल्याची चर्चा दबक्या आवाजात ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडात हडपसर मतदारसंघावरून संघर्षचा सूर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.