पुण्यातील पर्यटस्थळांवर बंदी, पर्यटकांच्या सुरक्षततेसाठी कलेक्टरांचे आदेश; कुठे आणि कधीपर्यंत प्रतिबंध?

प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर; तसेच वेल्हा तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले, स्मारक; तसेच पर्यटनस्थळ आणि धरणांच्या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी येत्या ३१ जुलैपर्यंत पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात नागरिकांची पर्यटनासाठी गर्दी होते. सुट्टीच्या दिवशी पुणे-मुंबईसह अन्य भागांतून पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्बंध घालण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणले. त्याची गंभीर दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३चे ‘कलम १६३’नुसार, पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये येत्या ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी लागू केले आहेत.
Polling booth in Society : पुण्यात सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे, विधानसभेसाठी निवडणूक आयोगाची पावलं, काय आहे प्रक्रिया

जमावबंदी कोठे?

– मावळ तालुक्यातील भुशी डॅम, धरणे व गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे, लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरण व गडकिल्ले परिसर.

– टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, राजमाची पॉइंट, खंडाळा, सहारा ब्रिज, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर

– मुळशी तालुक्यातील मुळशी धरण, ताम्हिणी घाट जंगल परिसर

– हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर

– आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा

– जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिक डोह

– भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे

– वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा

– खेड तालुक्यातील चासकमान धरण, भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर

– इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव बोटिंग क्षेत्र

पाचपेक्षा जास्त व्यक्तींना प्रतिबंध

पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना वरील ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि त्यात पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. धबधब्याच्या एक किलोमीटर भागात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, सहा चाकी वाहनांना प्रवेशास मनाई असल्याचे आदेशात म्हटले आहे.

वन, पर्यटन विभागात संभ्रम

पुणे जिल्ह्यातील काही गड किल्ले पुरातत्त्व विभागात येतात. किल्ल्यांचा काही भाग पर्यटन आणि वन विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या गड-किल्ल्यांवर नेमकी जमावबंदीची अंमलबजावणी कोणी करायची, याबाबत या सर्व विभागांत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असले, तरी अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने पोलिसांकडे बोट दाखविले आहे. मात्र, संबंधित पर्यटनस्थळे सुरू ठेवावीत, की बंद करावी, याबाबत संबंधित वन, पर्यटन आणि पुरातत्त्व विभागाचा गोंधळ उडाला आहे. कलेक्टरांचे आदेश; कुठे आणि कधीपर्यंत प्रतिबंध?