सासवड-नारायणपूर रस्त्यावर पाच ते सहा जण बुलेटवर फिरून फटाक्यांसारखा आवाज काढत होते. मात्र या आवाजाला वैतागून गावकऱ्यांनी या बुलेट धारकांना चांगलीच अद्दल घडवली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावकऱ्यांच्या निर्णयाचं कौतुक देखील केलं जात आहे.
काय घडलं त्या रात्री?
सासवड नारायणपूर रस्त्यावर असणाऱ्या भिवडी गावातील रस्त्यावरून पाच ते सहा जण त्यांच्या बुलेट वरून मोठा आवाज काढत चालले होते. या आवाजामुळे गावामध्ये असणाऱ्या लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. या त्रासाला कंटाळून पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावातील ग्रामस्थांनी या बुलेटधारक तरुणांना अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी रात्री मोठा कर्णकर्कश्श आवाज काढत रस्त्यावरून जाणारी बुलेट ग्रामस्थांनी अडवली. या बुलेटवर स्वार झालेल्या तरुणाला त्यांनी चोप दिला. त्यानंतर या बुलेटवर दगड घातले.
मोठमोठ्याने आवाज करणारी बुलेट चालवाल तर…
नारायणपूर परिसरामध्ये असे आवाज काढून बुलेट जर आणली तर त्याची अशीच अवस्था करण्यात येईल, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. बुलेट फोडतानाचा व्हिडिओ काढत येथील ग्रामस्थांनी मोठ्या आवाजात बुलेट चालवणाऱ्या तरुणांना इशारा दिला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे चांगलेच कौतुक होत आहे. या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.
अशा बुलेटच्या आवाजामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी देखील अशा मोठ्या आवाजाच्या बुलेटवर अनेकदा कारवाई केली आहे. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी मोठ्या आवाजात बुलेट फिरवत तरुणाई पाहायला मिळत आहे. मात्र पुरंदर तालुक्यातील या गावाने या बुलेट धारकांना घडवलेली अद्दल ही दुसऱ्या बुलेट धारकांना संदेश देणारी असेल असे समजायला हरकत नाही.