डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
कोंढव्यातील ज्योती हॉटेल येथील चौकात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुनील परशुराम परसैया (वय ४९, रा. मारुती आळी, कोंढवा) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. परसैया यांची पत्नी आशा (वय ४१) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकीस्वार सुनील परसैया मंगळवारी (३० एप्रिल) दुपारी पावणेबाराच्या सुमारास दुचाकीवरून निघाले होते. कोंढव्यातील ज्योती हॉटेल चौकात भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात सुनील गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला.
पादचारी तरुणाला डंपरची धडक
दुसरा अपघात मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन चौकात झाला. विवेक संजय कसबे हा तरुण पायी चालत जात असताना त्याला भरधाव डंपरने धडक दिली. त्यात विवेकच्या पायाला आणि मांडीला मोठी दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
महामार्ग ओलांडताना ट्रकने उडवले
लोणी काळभोर परिसरातील पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची धडक बसल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तानाजी किसन पवार (वय ३६, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पवार यांचे भाऊ संभाजी (वय ३८) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रविवारी (२८ एप्रिल) मध्यरात्री दोनच्या सुमारास तानाजी लोणी स्टेशन चौकातून रस्ता ओलांडत होते. त्या वेळी भरधाव ट्रकने तानाजी यांना धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला.
ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले
भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लोणीकंद येथील केसनंद रस्त्यावर घडली. रोहित काळूराम वारघडे (वय २५, रा. बकोरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ट्रकचालक रंगनाथ शिरसाठ (वय ४०, रा. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात ३० एप्रिलला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार वाघोली येथून बकोरीकडे जात होता. त्या वेळी ट्रक लोणीकंद येथून केसनंद बाजूने येत होता. ट्रकचालकाने अचानक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ट्रक घेतल्यानंतर दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे रोहित गाडीसह रस्त्यावर आडवा झाला. ट्रकचे मागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले.