पुण्यात दुपारपर्यंतच्या टप्प्यात सोसायटी भागातील मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसत होते. वस्ती भागातील मतदारांनी शेवटच्या तासाभरात मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. हा आकडाही लक्षणीय असल्याने ‘मतदानाचा पॅटर्न’ राजकीय पंडितांनाही चक्रावून टाकणारा आहे.
इतर पक्षांचे मतदान निर्णायक?
पुण्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोन उमेदवारांत प्रामुख्याने लढत झाली; तरीही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे आणि ‘एमआयएम’चे अनिस सुंडके प्रामुख्याने किती मते घेणार, यावर काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. प्रचारातील सूर पाहता पुण्यातील निवडणूक एकास एक झाली असल्याने ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ला फारसे मतदान पडेल, अशी शक्यता कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
‘कँटोन्मेंट’, ‘कसबा पेठ’ चर्चेत
पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील कसबा पेठ आणि कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात शेवटच्या तासाभरात जवळपास २६ हजार मतदान झाले आहे. ‘कँटोन्मेंट’मध्ये काँग्रेसचा प्रभाव सर्वाधिक राहील, अशी चर्चा आहे. कसबा पेठ मतदारसंघाचे आमदार काँग्रेसचे उमेदवार असल्याने येथे किती मताधिक्य मिळणार, यावर काँग्रेसच्या विजयाचे गणित अवलंबून राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वडगाव शेरीत मतदानात वाढ
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शेवटच्या तास-दीडतासात २७ हजार मतदान वाढले आहे. हे वाढलेले मतदान भाजपची डोकेदुखी वाढविणारे ठरू शकते. या मतदारसंघात २०१९च्या तुलनेत जवळपास ३६ हजार मतांमध्ये वाढ झाली. यात नवमतदारांची संख्याही लक्षणीय असल्याने वडगाव शेरी मतदारसंघ विजयाचा ‘ट्रेंड’ निश्चित करणारा आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला येथून मोठे मताधिक्य मिळाले असले, तरी विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे वडगाव शेरीचे मताधिक्य ज्या उमेदवाराला त्याचा विजय निश्चित, असे समीकरण राहणार असल्याची चर्चा आहे.
‘कोथरूड’ भाजपचा बालेकिल्ला?
कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १७ हजार मतांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी या मतदारसंघातील सुमारे ३० हजार मतदारांची कमी झालेली नावे ही भाजपसाठी डोकेदुखी ठरणारी असेल, अशी शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपला मिळणारे अधिकाधिक मताधिक्य भाजपच्या विजयाची नांदी ठरते. त्यामुळे हे मताधिक्य कमी करण्यासाठी काँग्रेसने केलेले प्रयत्न कितपत यशस्वी होतात, यावर दोन्ही उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
मतदानाचा पॅटर्न (टक्केवारीत)
विधाससभा मतदारसंघ | दुपारी एक वाजेपर्यंत | सायंकाळी पाच वाजेपर्यंत | अंतिम मतदान | शेवटच्या तासातील मतदान |
कसबा पेठ | ३५.२३ | ५१.०७ | ५९.२४ | ८.१७ |
पर्वती | २७.१४ | ४६.८ | ५५.४७ | ८.६७ |
पुणे कँटोन्मेंट | २३.२१ | ४४.०१ | ५३.१३ | ९.१२ |
कोथरूड | २९.१ | ४८.९१ | ५२.४३ | ३.५२ |
वडगाव शेरी | २४.८५ | ४०.५ | ५१.७१ | ११.२१ |
शिवाजीनगर | २३.२६ | ३८.३३ | ५०.६७ | ११.९४ |
विधानसभा मतदारसंघ | एकूण मतदान | झालेले मतदान |
वडगाव शेरी | ४,६७,६६९ | २,४१,८१७ |
कोथरूड | ४,१४,७५५ | २,१७,४५५ |
पर्वती | ३,४१,०५५ | १,८९,१८४ |
कसबा पेठ | २,७६,९९७ | १,६४,१०५ |
पुणे कँटोन्मेंट | २,८२,२७० | १,४९,९८४ |
शिवाजीनगर | २,७८,५३० | १,४१,१३३ |