रेल्वेकडून विशेष मोहीम
पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर ही महत्त्वाची स्थानके आहेत. पुणे विभागातून लांब पल्ल्याच्या व इतर अशा २०० गाड्या धावतात. या गाडीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी रेल्वेकडून विशेष मोहीमदेखील राबवली जाते. गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीदरम्यान तीन लाख ७० हजार ८२४ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून २७ कोटी ८३ लाख पाच हजार ३५ रुपये दंड वसूल करण्यात आला.
स्लीपर बोगीतून पाच कोटी
आरक्षित स्लीपर बोगीतून बेकायदा प्रवास करणाऱ्याकडून पाच कोटी ९९ लाख ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. प्रवासादरम्यान क्षमतेहून अधिक साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून दोन लाख ४९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उत्तरेकडे जाणारे फुकटे जास्त
रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर वारंवार कारवाई करण्यात येते. मात्र, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात पुणे विभागातून तीन लाख ३९ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. उत्तरेकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून गोरखपूर, दानापूर, इंदूर, झेलम या गाड्यांमध्ये वारंवार तिकीट तपासनीसांची संख्या वाढवण्यात येते. मात्र, या गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा; अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. – डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक
२०२३-२४ वर्षातील फुकट्या प्रवाशांवरील कारवाई
कारवाईचा प्रकार संख्या उत्पन्न (रुपयांत)
विनातिकीट प्रवास २,६७,३९६ २,१८,०७३,२००
बेकायदा प्रवास १,०१,२२० ५,९९,८१,८६५
सामान बुक न करता जाणारे २,२०८ २,४९,९७८
एकूण कारवाई ३,७०,८२४ २७,८३,०५,०३५