पुणे पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसून केल्याचा आरोप करून आरोपीला फायदा पोहोचविण्यासाठी त्यांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत, असा आरोप विरोधी पक्षाकडून होऊ लागल्यानंतर घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन दिले. त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्राथमिक चौकशीअंती येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना दोषी ठरवून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
आरोपीला फायदा पोहोचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात घोळ केला : वडेट्टीवार
आरोपीला फायदा पोहोचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात घोळ केला. घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी, अशी मागणी करत पुणे पोलिसांची देखील चौकशी व्हावी, असे त्यांनी यावेळी नमूद केले. तर पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती? ही दिशाभूल का केली जात आहे? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
राजकीय दबाव नेमका कुणाचा? आरोपीला इतक्या झटकन जामीन कसा मिळाला?
‘पुणे अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी फोन केला होता, तिथे वकील कोणी पाठवला, त्या आरोपीला इतक्या झटकन जामीन कसा मिळाला, या सगळ्यांची उत्तरे राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिली पाहिजेत,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ‘कुणाच्या राजकीय दबावामुळे संबंधित मुलाला जामीन मिळाला, राजकीय दबावाला बळी पडू नका असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस नेमके कुणाबद्दल बोलत होते, हे त्यांनी राज्याला सांगावे,’ असे सुळे म्हणाल्या. पुण्यात गंभीर अपघात झाला, इंदापूरच्या धरणात सहा जणांचे बळी गेले. दुष्काळाचा प्रश्न गंभीर होत असतानाच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कुठे आहेत, असा प्रश्न त्यांनी केला.