कल्याणीनगर अपघातानंतर येरवडा पोलिसांनी अल्पवयीन कारचालक युवकाला ताब्यात घेऊन, त्याच्यावर भारतीय दंड संहितेनुसार, बेदरकारपणे वाहन चालविणे, इतरांच्या जीवाला धोका पोहोचविणारी कृती करणे यांसह मोटार वाहन कायद्याखाली कलम लावण्यात आले. या प्रकरणातील विविध आरोपींवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटकेच्या कारवाया देखील केल्या आहेत. दरम्यान मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धनाढ्य बापाच्या लेकाने दोन जीव घेऊनही त्याला मिळालेल्या जामीनावर अप्रत्यक्ष टीका केली.
राहुल गांधी काय म्हणाले?
ओला, उबर, ट्रक ड्रायव्हर यांच्याकडून जर चुकून अपघात झाला, यांच्या हातून जर कुणाचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांची शिक्षा होते, पण श्रीमंत बापाचा पोरगा दारू पिऊन पोर्श गाडी चालवून दोन लोकांची हत्या करतो तर त्याला निबंध लिहायला सांगितले जाते. ओला, उबर, ट्रक ड्रायव्हर यांच्याकडून निबंध लिहून का घेतला जात नाही? एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांना विचारलं गेलं, इथे दोन भारत निर्माण होतायेत- एक गरिबांचा भारत आणि दुसरा श्रीमंतांचा भारत, त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले, मग मी काय सगळ्यांना गरीब बनवू? इथे प्रश्न न्यायाचा आहे. गरीब आणि श्रीमंतांनाही न्याय मिळायला हवा. न्याय सगळ्यांना सारखा हवा, त्यासाठीच तर आम्ही अन्यायाविरोधात लढतो आहोत.
बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात आम्ही वरील कोर्टात दाद मागणार : फडणवीस
बालहक्क मंडळाच्या भूमिकेने खरेतर पोलिसांना जबर धक्का बसला. आरोपीला घटनेच्या २४ तासांच्या आतच जामीन दिल्यानंतर लोकांमध्ये संताप आणि नाराजी आहे. आरोपीची सहज सुटका होणे हे सहन केले जाणार नाही, असे सांगून बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात आम्ही वरील कोर्टात दाद मागणार असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.