बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याच्या तरतुदीनुसार विधिसंघर्षित मुलाचा जबाब त्याच्या पालकांच्या उपस्थितीत नोंदविला जातो; परंतु या मुलाचे वडील आणि आजोबा चालकाला धमकावल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याच्या आईला व मोठ्या भावाला नोटीस बजावून चौकशी प्रसंगी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र, आईशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे मुलाचा मोठा भाऊ आणि बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जबाब नोंदविला जाईल. जबाब नोंदवण्याची परवानगी मागणारा अर्ज तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी बाल न्याय मंडळाकडे अर्ज सादर केला होता.
अपघात झाला त्यावेळी गाडीत कोण होते? गाडी कोण चालवत होते? अपघाताच्यावेळी नेमके काय झाले? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळण्याचा अंदाज आहे. सध्या अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात असून, त्याचा मुक्काम ५ जूनपर्यंत तेथे आहे. चौकशीच्या वेळी पालकांना उपस्थित राहण्यासाठी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
या प्रश्नांची मिळणार उत्तरे
मुलगा पार्टीला जाताना घरातून किती वाजता बाहेर पडला? त्यावेळी गाडी कोण चालवत होते? पार्टीसाठी मुलगा कोणत्या-कोणत्या पबमध्ये गेला? तेथे त्याने कोणासोबत मद्यप्राशन केले? पबमधून बाहेर पडल्यानंतर गाडी कोण चालवत होते? त्याचबरोबर गाडीत मुलाचे कोण आणि किती मित्र होते? अपघात नेमका कसा झाला? गाडी किती वेगाने धावत होती? अपघातस्थळावर नेमके काय घडले? पोलिस किती वेळाने घटनास्थळी आले. पोलिस ठाण्यात मुलाला किती वाजता घेऊन जाण्यात आले? तसेच मुलाला पोलिसांनी बर्गर आणि पिझ्झा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीत हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पोलिस ठाण्यात नेमके काय घडले?
अपघातानंतर पोलिस मुलाला येरवडा पोलिस ठाण्यात घेऊन गेले. गुन्ह्यातून मुलाला वाचविण्यासाठी बिल्डर बापाने तेथूनच ‘फिल्डिंग’ लावल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांना कोणत्या लोकप्रतिनिधीने फोन केले होते का? गुन्हा दाखल करतेवेळी चालकावर दबाव टाकण्यात आला का? चालकाला पोलिसांनी कोणत्या खोलीत बसवले? तेथे त्याच्याबरोबर कोणकोण होते? मुलगा पोर्शे गाडी कधीपासून चालवत होता? या प्रश्नांची उत्तरे मिळण्याती शक्यता आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
रक्तनमुने बदलाचे चित्र स्पष्ट होणार
मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात घेऊन आल्यानंतर तेथे त्याचे रक्त काढून घेतले. मात्र प्रत्यक्ष परीक्षणासाठी देताना दुसऱ्याचे रक्त देण्यात आले. ससूनच्या दोन डॉक्टारांनी हे कृत्य केले. मुलाला हे रक्तनमुने कोणी आणि कसे बदलले याबाबत माहिती आहे. त्यामुळे पोलिसांना चौकशीत ही माहिती मिळू शकते. वैद्यकीय चाचणीच्यावेळी त्याच्यासोबत घरातील व बाहेरील कोणकोणत्या व्यक्ती होत्या हेदेखील समजू शकते.