पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या चार तालुक्यांचा जुन्नर वन विभागात समावेश होतो. वन विभागाचे क्षेत्र व्यवस्थापनाच्या दृष्टीने जुन्नर, ओतूर, मंचर, बोडेगाव, खेड, चाकण, शिरूर या सात वन परिक्षेत्रांमध्ये विभागलेले आहेत. जुन्नर वन विभागाचे बहुतांश क्षेत्र डोंगराळ आहे. त्यात जलसंपदा विभागाचे सिंचन प्रकल्प आहेत. घोड आणि कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, माणिकडोह, पिपळगाव जोगे, बडन, चिल्हेवाडी, चासकमान असे मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प असल्याने सिंचन सुविधेत वाढ झाली आहे.
ऊस शेतीत बिबट्यांचा अधिवास
पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब अशी बागायती पिके या भागात घेण्यात येतात. दिर्घकालीन पिकांमध्ये बिबट्यांना लपण्यासाठी उत्तम निवारा आणि पाण्याची मुबलक उपलब्धता असते; तसेच शेतीमुळे मानवाची पाळीव प्राण्यांसह शेतातील रहिवासांमध्ये वाढ झाली आहे. पाळीव प्राणी भक्ष्य म्हणून सहज उपलब्ध होत असल्याने बिबट्याचा अधिवास अशा क्षेत्रात वाढला आहे. बिबट्यांचे वास्तव्य हे प्रामुख्याने ऊस शेतीत आहे. या प्रकरणी गेल्या २३ वर्षांपासून जुन्नर वन विभागात मानव-बिबट संघर्षामध्ये वाढ होत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.
चार तालुक्यांत ४५० बिबटे
डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत जुन्नर वन विभागाच्या हद्दीतील वनप्राण्यांचा अभ्यास करण्यात आला. या क्षेत्रात बिबट्याच्या संख्येची घनता प्रति १०० चौरस किलोमीटरमध्ये सहा ते सात बिबटे इतकी आढळून आली आहे; तसेच बिबट्यांचे मानवावरील, पशुधनावरील हल्ले पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्यांची एकूण संख्या ४०० ते ४५० असण्याची शक्यता आहे. जुन्नर वन विभागात मागील पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात ४० जण गंभीर जखमी झाले असून, १६ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याचा मानवावरील हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम (३०) अन्वये जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांतील २३३ अतिसंवेदनशील गावे ही संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.