मुंबईत मुसळधार, पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
रायगड जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये पावसाने धुमशान घातलं असून पूरस्थिती निर्माण झाली होती. तर राज्यातही बहुतांश भागात मुसळधार पाऊस बरसला, त्यानंतर पावसाने जरा ब्रेक घेतला. गेल्या २४ तासात मुंबईत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तर आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड-रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट
आज रायगडसह रत्नागिरीलाही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, वर्धा, अमरावती, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील ४ ते ५ दिवस कोकणात अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तर प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.
तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही आज चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील चार दिवस राज्यात जोरदार पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागाने दिला असून पुढील चार दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचं दिसून येत आहे. हवामान खात्याने मंगळवारी महाराष्ट्रासह केरळ, गोवा, कर्नाटक आणि गुजरातचा अतिवृष्टीचा इशारा दिला असून पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.