कालपासून मागील २४ तासांत मुंबई, ठाण्यात पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, १५ जुलैपर्यंत महाराष्ट्रात सर्वसाधारण १५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. कोकणात ३० टक्के आणि मध्य महाराष्ट्र २२ टक्के पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भात सर्वसाधारण पाऊस झाला आहे. मात्र मराठवाडा अजूनही यंदाच्या मोसमातील चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
हवामान खात्याने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, अमरावती, वर्धा, सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचल्याच्या अनेक घटना समोर आल्या. तसंच अनेक शहरात पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. अशात अनेकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. दुसरीकडे अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांमध्ये जवळपास आठवडाभरानंतर रविवारी संध्याकाळपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
दरम्यान, हवामान विभागाने केरळ, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडमध्ये १७ आणि १८, राजस्थामध्ये १८, ओडिशात १९ आणि आंध्र प्रदेश – तेलंगानामध्ये १८ आणि १९ जुलै रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात हवामन विभागाने उत्तर प्रदेशसह इतर १९ राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.