काटेवाडी येथे अजित पवार यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांच्या समवेत त्यांच्या पत्नी आणि बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, तसेच अजित पवार यांच्या आईने मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, ही निवडणूक स्थानिक स्तरावरची नाही, असे असताना देखील विरोधकांकडून माझ्या विरोधात अनेक आरोप केले गेले. माझ्या विरोधात माझे कुटुंब उभे राहिले. पण, आई माझ्यासोबत आहे असे त्यांनी ठणकावून देखील सांगितले.
पैसे सापडल्याच्या आरोपांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, पीडीसीसी बँक तुम्हाला कधी रात्रीची उघडी दिसली? तुम्ही मिडियात आहात म्हणून कसलेही आरोप करायचे. हे चुकीचं आहे. विरोधकांनी या निवडणुकीच्या काळात माझ्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, येणाऱ्या निवडणुकीतून जनता त्यांना उत्तर देईल असे देखील अजित पवार म्हणाले. आमच्या माहायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सर्व मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. प्रचारादरम्यान सर्वांनी एक दिलाने काम केले.
तसेच, उन्ह जास्त आहे. त्यामुळे मतदारांनी सकाळच्या वेळी बाहेर पडून जास्तीत मतदान करावे, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले आहे.
रोहित पवारांचा आरोप
पीडीसीसी बँकेच्या वेल्हे शाखेतील #घड्याळ बहुतेक बंद पडलंय…. आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे… कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर #ओव्हर_टाईम सुरू असावा… निवडणूक आयोग दिसतंय ना?, असं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत त्यांनी अजित पवारांवर आरोप केले होते.
पराभवाच्या भीतीने पायाखालची जमीन सरकली, हे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे – रोहित पवार
आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. येथे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंब एकमेकांविरोधात लढत आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.